नवी दिल्ली, 02 मार्च: जगभरात वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही कोरोना विषाणूचा (Coronavirus Pandemic) कहर सुरुच आहे. लस उपलब्ध होऊन देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11.49 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण मोहीम (Corona Vaccination Drive) सुरू करण्यात आली आहे. याचदरम्यान, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनने (World Health Organization) सांगितलं की, 'या वर्षी जग कोरोनापासून मुक्त होणार नाही.' WHOचे इमर्जन्सी डायरेक्टर मायकल रेयान यांनी सोमवारी याबाबत इशारा दिला. ते म्हणाले की, 'गेल्या आठवड्यामध्ये जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढली यातून आपल्याला धडा घेण्याची गरज आहे.'
मायकल रेयान यांनी सांगितलं की, 'यावर्षी कोरोनाच्या लढाईमध्ये जगाला यश मिळेल असा विचार करणं खूप चूकीचं आहे. पण रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा कमी करुन आपण यातून बाहेर पडू शकतो.' www.worldometers.info/coronavirus च्या मते, 'आतापर्यंत 9 कोटी 6 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत 25 लाख 49 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.'
(हे वाचा-शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ, 120 विद्यार्थी क्वारंटाइन)
कोरोनाची प्रकरणं वाढणं चिंतेचा विषय: गेब्रेसिएस
WHOचे चीफ ट्रेडोस गेब्रेसिएस यांनी सांगितलं की, 'मागच्या आठवड्यात युरोप, अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियामधील देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं खूप वाढली असं गेल्या सात आठड्यांमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळालं. त्यांनी सांगितले की, 'हे खूप निराशाजनक आहे. या मागचं मोठं कारण म्हणजे काही देशांमध्ये नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे.'
आफ्रिकी देशांत लसीकरण सुरु
याच दरम्यान आफ्रिकेतील देशांमध्ये कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. WHOनं सांगितलं की, 'पश्चिम आफ्रिकन देश घाना आणि कोट-डिवॉयमध्ये नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यातच या देशामध्ये सीरम इन्स्टिट्यूटची लस दाखल झाली. 24 फेब्रुवारीला घानामध्ये लसीचे 6 लाख डोस देण्यात आले. दोन दिवसांनंतर कोट-डिवॉयमध्ये 5.04 लाख डोस देण्यात आले. सर्व देशांपर्यंत लस पोहचवण्याची मोहीम कोव्हॅक्सच्या माध्यमातून सुरू आहे.
(हे वाचा-लस घेऊनही जिल्हा आरोग्य अधिकारी COVID-19 पॉझिटिव्ह, बीडमध्ये उडाली खळबळ)
भारतामध्ये कोरोनाची काय परिस्थिती?
देशामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार पुन्हा एकदा झपाट्याने होऊ लागला आहे. सध्या देशामधील कोरोनाची नवीन प्रकरणं पाहिली तर असं दिसून येतं की, देशातील 22 राज्यांमध्ये 140 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. भारतामध्ये या वेळी कोरोना संसर्गाची 1.68 लाख सक्रिय प्रकरणं आहेत. या बाबतीत आपला देश जगभरात 13व्या स्थानी पोहचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona vaccine, Corona vaccine cost, Corona vaccine in market, Corona virus in india, Coronavirus, World After Corona