Home /News /coronavirus-latest-news /

भारतात रुग्णसंख्या जास्त, पण मृत्यूदर सर्वात कमी; काय आहे या आकड्यांमागची खरी गोष्ट?

भारतात रुग्णसंख्या जास्त, पण मृत्यूदर सर्वात कमी; काय आहे या आकड्यांमागची खरी गोष्ट?

देशातली Covid-19 रुग्णांची संख्या उच्चांक गाठत असतानाच मृत्यूदर कमी झाला म्हणून दिलासा वाटत असेल, तर आधी हे भीषण वास्तव वाचा. Coronavirus चं गांभीर्य कसं कमी झालेलं नाही, फक्त दाखवलं जातंय हे सांगणारी धक्कादायक गोष्ट

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : Coronavirus ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांना याचा मोठा फटका बसला असून अमेरिकेपाठोपाठ भारतात दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आहेत. संपूर्ण भारतात सध्या 60 लाखांहून आधिक रुग्ण असून महाराष्ट्रातच यातले 10 लाखांवर Covid रुग्ण आहेत.  जवळपास 75 हजार रुग्णांचा मृत्यू देखील देशात झाला आहे. कोरोनारुग्णांची ही मृत्यूसंख्या (Covid mortality rate) जगभरात तिसऱ्या क्रमांकाची आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या असली तरीदेखील मृत्यूदर (death rate) सर्वात कमी आहे. त्यामुळे जगभरात सर्वात जास्त मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरीदेखील एकूण रुग्णांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर आटोक्यात आहे, असं आकडेवारी सांगते. पण या आकडेवारीमागचं खरं चित्र काय आहे? भारताचा कोरोना मृत्यूदर हा 1.7% असून अमेरिकेमध्ये तो 3% तर ब्रिटनमध्ये 11.7% आणि इटलीमध्ये 12.6% आहे. त्यामुळे भारत सरकारने उचललेल्या तातडीच्या पावलांचं कौतुक होत आहे. योग्य सुरक्षा उपाययोजनांमुळे हा मृत्यूदर आटोक्यात राहण्यास मदत झाली, असं सांगितलं जातं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑगस्ट महिन्यात भारताचा मृत्यूदर हा 1 टक्क्यापेक्षा खाली नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं. 11 सप्टेंबरचे जगभरातले आकडे खालच्या तक्त्यात पाहा. हळूहळू भारतातील मृत्यूदर कमी होत असून लवकरच तो 1 टक्क्याच्या खाली येण्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. मात्र अनेक शास्त्रज्ञांनी या आकड्यांविषयी चिंता व्यक्त केली असून हे आकडे दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. देशात अजूनही Coronvirus काळापूर्वीची परिस्थिती नाही. Lockdown आणि निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध हटवले आणि देश संपूर्ण पूर्ववत सुरू झाला तर परिस्थिती आणखी भयानक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातील कोरोनाची सद्यस्थिती मार्चमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्यानंतर भारतातील रुग्णांचे आकडे हे वाढतच आहेत. तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती. मात्र जूनमध्ये लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात झाल्यानंतर भारतातील रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाला हजारो रुग्ण वाढत असून 17 जुलै रोजी देशभरात 10 लाख रुग्ण होते. आता एकट्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या 10 लाख झाली आहे. हा टप्पा गाठाच्या आदल्या दिवशीचे 10 सप्टेंबरपर्यंतचे देशभरातले आकडे खालच्या तक्त्यात पाहा. दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली असून जुलैच्या पुढील 2 आठवड्यांत 20 लाख त्यानंतर 16 दिवसात 30 लाख आणि 12 दिवसांमध्ये 40 लाख रुग्णसंख्या झाली आहे. नवी दिल्ली आणि मुंबई या भारतातील सर्वात मोठ्या दोन शहरांमध्ये कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या शहरांमध्ये असलेल्या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याने साथ सगळीकडे पसरली. या ठिकाणी असलेल्या दाट लोकवस्तीच्या घरांमुळे लोकांना एकमेकांपासून दूर राहण्यास अडचण निर्माण होत होती. सोशल डिस्टन्सिंग राखणं या भागात अशक्य असतं. मार्च आणि एप्रिल महिन्यात सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन ठेवलं होतं. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला. अनेक हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. त्यामुळे भारत सरकारला हळूहळू देश सुरू करण्यास भाग पडले. भारतात मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाच्या काळात रोजगार गमवावा लागला. त्याचबरोबर देशाची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाल्याने देशातील अनेक कंपन्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू कराव्या लागल्या. त्याचबरोबर आता जिल्हाबंदी, राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरची बंधनसुद्धा उठली आहेत. या महिन्यातील 21 तारखेपासून देशभरातील शाळा देखील सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रम आणि खेळांच्या आयोजनांवरची बंदी उठली आहे. जास्तीत जास्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत असे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आकडेवारी योग्य आहे का ? कोरोनाचे रुग्ण (Covid-19 patients) संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मात्र मृत्यूदर कमी होत आहे. त्यामुळे रुग्संख्या बेसुमार वाढली तरी दिलासा मिळाला आहे. लोकांनी हा आजार गंभीरपणे घेणं कमी केलं आणि त्यामुळेही रुग्णसंख्या आणखी वेगाने वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्या मृत्यूदर खूपच कमी झालेला आहे. एप्रिलमध्ये मृत्यूदर हा 4 टक्के होता. तर ऑगस्टमध्ये तो 2.15% आणि आता सप्टेंबरमध्ये तो 1 टक्क्यापर्यंत आला आहे. मात्र अनेक तज्ज्ञांच्या मते ही, आकडेवारी फसवी असून भारतात आरोग्य व्यवस्था तोकडी आहे. अनेक रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसून यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तो Covid मुळे झालेला मृत्यू आहे का, हे तपासायलासुद्धा कदाचित तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती अनेक ग्रामीण भागात आहे. भारतात झालेल्या केवळ 86 टक्के मृत्यूंची नोंद करण्यात आली असून यामधील केवळ 22 टक्के रुग्णांच्या मृत्यूचे कारण नोंदवण्यात आले आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. आकडेवारीमागचं भीषण वास्तव भारतात होणारे अनेक मृत्यू हे घरी होत असतात. रुग्णालयात दाखल करेपर्यंतची व्यवस्थाच नसल्याने उपचारांअभावीच हे मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदले जातात. त्यामुळे अशा रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येत नसून अशा अनेक रुग्णांच्या मृत्यूची नोंद देखील होत नाही. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांची आरोग्य मंत्रालयाच्या मेडिकल सर्टिफिकेट विभागाकडे नोंद नसल्याने या ठिकाणी होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांची नोंदच घेतली जात नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मृत्यूंची नोंद होत नसून दिल्लीमध्ये केवळ 63 टक्के रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचीच नोंद होत असते. त्यामुळे आपण विचार करू शकतो की, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांसारख्या अविकसित राज्यांमध्ये काय परिस्थिती होत असेल. या ठिकाणी केवळ 35 टक्के रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद होत नसल्यामुळे खरा डेटा समोर येत नाही. कोरोनच्या सर्व मृत रुग्णांची नोंद नाही कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट होत नसल्यामुळे (Covid test) अनेक मृत्यू कशामुळे झाले आहेत हे समोर येत नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे की नाही हे समजत नाही. अशा संदिग्ध अवस्थेतल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असू शकतो. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर जेवढा कमी असल्याचं दाखवलं जातं, तेवढा तो खराच कमी आहे का याचा कोणताही ठोस पुरावा भारताच्या आरोग्य विभागाकडे नाही. भारतात सध्या कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र भारताची लोकसंख्या लक्षात घेता होणाऱ्या चाचण्या अजूनही फार कमी आहेत. या आकडेवारीचा विचार केला तर, दरदिवशी केवळ 10 लाख नागरिकांमागे केवळ एकाच व्यक्तीची टेस्ट केली जाते आहे. भारताशी तुलना केली तर अमेरिकेमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 150 टेस्ट तर ऑस्ट्रेलियामध्ये 156 टेस्ट करण्यात येत आहे. जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित आढळला आणि जर त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असल्यास (Comorbidity) तर त्याच्या मृत्यूची नोंद कोरोनाने झाल्याची होत नाही. त्यामुळे देखील भारतात मृत्यूदर कमी असल्याचे दिसून येत आहे. टेस्टमुळे चुकीचे मृत्यूदर समोर भारतात सध्या मोठ्या प्रमाणांत टेस्टिंग होत आहे. मात्र यामुळे रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये सर्व मृत्यू हे एकूण रुग्णसंख्येमधील आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना मृत्यूदर हा कमीच होणार आहे. देशभरात मृत्यूदर कमी होत असल्याचं सांगून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. कारण मृत्यूदर कमी होणं म्हणजे आजार गंभीर नसणं असं होत नाही. मृत्यूदर कमी होत असले तरीही दररोज होणारे Corona मृत्यू कमी होत नाहीत, हे कोणी लक्षात घेताना दिसत नाही. एका बाजूला रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात ही संख्या दिवसाला 750 असताना सध्या दिवसाला 1000 व्यक्तींचा मृत्यू होताना दिसून येत आहे. हे साथ गंभीर स्वरूप धारण करत असल्याचंच उदाहरण आहे. नक्की कोरोनाचे मृत्यू किती? भारतात नक्की किती मृत्यू झाले आहेत याची कोणतीही नोंद नाही. भारतात मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येमुळे सर्व मृत्यूंची नोंद ठेवणं कठीण जात आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सर्व यंत्रणा यामध्ये समाविष्ट असल्याने  ही आकडेवारी जमा करणे मोठं अवघड काम आहे. काही ठिकाणी घरोघरी जाऊन हे काम करावं लागतं. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ असू शकते. सध्या सरकारकडे 2018 पर्यंतची आकडेवारी असून 2020 मधील आकडेवारी मिळण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांच्या तुलनेत आपला कोव्हिड मृत्यूदर कमी असला तरीदेखील या काळात सुरक्षा आणि सावधानता बाळगणं गरजेचं आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून तुम्हाला मधुमेह, ब्लड प्रेशरसारखे इतर आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे, हाच या आकडेवारीच्या झांगडगुत्त्यामागचा उद्देश.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या