मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

प्राण्यांनाही कोव्हिडचा धोका? सोशल डिस्टन्सिंग का गरजेचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण

प्राण्यांनाही कोव्हिडचा धोका? सोशल डिस्टन्सिंग का गरजेचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : नोव्हेल कोरोना व्हायरस या प्राणघातक विषाणूने संपूर्ण जगावर विध्वंसक परिणाम केला आहे. या व्हायरस विरूद्ध सर्वांत सामान्य आणि प्रभावी खबरदारीचा उपाय म्हणजे मास्कचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्सिंग राखणं. या खबरदारीच्या सवयी आपण फक्त समाजातील मनुष्यांपुरत्याच मर्यादित केल्या आहेत. परंतु, आता आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्राण्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची पद्धत वापरायला सुरुवात करायला हवी.

डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार स्वित्झर्लंडमधील आरोग्यतज्ज्ञांनी असं म्हटलं आहे की या प्राणघातक विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पाळीव प्राण्यांनी सोशल डिस्टन्सिंग राखले पाहिजे. कुत्र्यांनी एकमेकांमधील अंतर दोन मीटर ठेवावं आणि मांजरी घरातच ठेवाव्यात, असा सल्ला दिला गेला आहे. अर्थात या पाळीव प्राण्यांच्या मालकांनी ही काळजी घ्यायला हवी. या सिद्धांताला संशोधनाचा आधार आहे, असा दावा केला गेला आहे की मांजर, हॅमस्टर यांच्यासह फेरेट्स आणि मिंकससारख्या इतर पाळीव प्राण्यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

स्विस अ‍ॅनिमल क्लिनिक AniCura येथील पशुवैद्य जोहान्स कॉफमन म्हणाले, “द [अमेरिकन] सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) हे लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करण्याचा सल्ला देत आहे.” तज्ज्ञांनी असंही सांगितलं की कोरोना व्हायरस हे पाळीव प्राण्यांच्या नेझल सिक्रिशनच्या (नाकातील स्राव) तुलनेत त्यांच्या अंगावरील केसांमध्ये म्हणजे फरमध्ये जास्त काळ राहण्याची शक्यता आहे.

स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठातील व्हायरॉलॉजिस्ट व्होकर थायल यांनी AniCura च्या सल्ल्यांना सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले, “खबरदारी म्हणून माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांसाठीही सोशल डिस्टन्सिंग उपयोगी ठरू शकतं जेणेकरून ते इतर प्राण्यांमध्ये किंवा मनुष्यांमध्ये व्हायरस संक्रमित करू शकणार नाहीत.”

आजपर्यंत असे कोणतेही दस्तऐवजी पुरावे नाहीत जे सांगतात की मनुष्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांमधून नोव्हेल कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. झू किंवा नॅशनल पार्कमध्ये काही प्राण्यांच्या कोव्हिड-19 तपासणी झाल्यावर ते पॉझिटिव्ह असल्याचे किस्से समोर आले आहेत परंतु आजपर्यंत पाळीव प्राण्यांकडून त्यांच्या मालकांना संसर्ग झाल्याचे कोणतेही प्रकरण आढळलेले नाही.दरम्यान, स्वित्झर्लंडच्या फेडरल फूड सेफ्टी आणि व्हेटर्नरी ऑफिसने (FSVO) प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या संसर्गांवर संशोधन करण्याच्या तयारी असल्याचं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

First published: