वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर: गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने (Corona Pandemic) धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनानं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो जणांचा बळी घेतला. प्रसार सुरू झाल्यानंतर तत्काळ जगभरातल्या संशोधकांनी कोरोनाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं. विषाणूची उत्पत्ती (Origin of the virus), विकास आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन करण्यात आलं. महामारी सुरू होऊन जवळपास वर्ष झाल्यानंतर कोरोनाची तीव्रता काही प्रमाणात कमी करणारी लस निर्माण करण्यात संशोधकांना यश आलं. सध्या जगभरात वेगात लसीकरण (Coronavirus Vaccination) सुरू आहे. लसीकरण सुरू असलं, तरी संशोधकांनी कोरोना महामारीच्या उत्पत्तीबाबतचं संशोधन थांबवलेलं नाही.
जगभरातल्या विविध ठिकाणी कोरोनाबाबत संशोधन अव्याहतपणे सुरूच आहे. अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या अभ्यासामध्ये कोरोना उत्पत्तीबाबत (Covid-19 Origin) एक नवीन गोष्ट समोर आली आहे. कोरोना महामारीचा पहिला रुग्ण (First Covid-19 Patient) चीनमधल्या वुहान सी फूड मार्केटमधला (Wuhan Sea food Market) एक विक्रेता असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. अगोदर समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान सी फूट मार्केटमधला एक अकाउंटन्ट असल्याचं मानलं जातं होतं.
हे वाचा-IIT बॉम्बेनं केलं Alert! तुमच्या घरातच आहे Corona चा 10 पट जास्त धोका
कुठल्याही आजाराच्या पहिल्या रुग्णाला 'पेशंट झिरो' (Patient Zero) किंवा 'इंडेक्स पेशंट' असं म्हटलं जातं. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पेशंटबाबत विविध प्रकारे संशोधन करण्यात आलं होतं. आता नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार, वुहान सी-फूड मार्केटमधला एक विक्रेता कोरोनाचा 'पेशंट झिरो' होता. कारण, सर्वांत प्रथम वुहानमध्येच कोरोना महामारीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोविड-19 ला वुहान व्हायरसदेखील म्हटलं जात होतं. नंतर संशोधकांनी त्याचं नाव SARS-CoV-2 असं ठेवलं. चीनकडून सातत्यानं कोरोनाबाबतची माहिती लपविल्यानं जगाचा संशय अधिकच वाढला आहे. चीनमधली वुहान व्हायरोलॉजी लॅबही (Wuhan Virology Lab) संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
'जर्नल सायन्स' नावाच्या एका जर्नलमध्ये अॅरिझोना युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक मायकेल वोरोबी यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाचा पहिला रुग्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकाउंटन्टचं प्रकरण 16 डिसेंबर 2019 रोजी समोर आलं होतं; मात्र त्यापूर्वीच वुहानच्या सीफूड मार्केटमधल्या एका विक्रेत्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली होती.
हे वाचा-अशाप्रकारे गुंतवणूक केल्यास व्हाल कोट्यवधींचे मालक! वाचा काय आहे सिक्रेट
सध्या युरोपमधल्या अनेक देशांसह चीनमध्ये पुन्हा कोरोनानं आपलं डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये ठिकठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मायकेल वोरोबी (Michael Worobi) यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनाचा विचार केल्यास, कोरोनाच्या पेशंट झिरोबाबत पुन्हा तीव्र चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वर्षाच्या (2021) सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्या एका टीमनं चीनमध्ये कोरोनाच्या उत्पत्तीबाबत अभ्यास केला होता; मात्र चीननं त्यांना स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची परवानगी दिली नाही, अशी माहिती या टीममधल्या संशोधकांनी दिली होती. त्यामुळे चीनवरचा संशय अधिक बळावला होता. आता पुन्हा पेशंट झिरोबाबत नवीन माहिती समोर आल्याने पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus