Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाचा फुप्फुसावरच नाही, तर मेंदूवरही हल्ला; 5 वर्षांनी घटतंय आयुष्य

कोरोनाचा फुप्फुसावरच नाही, तर मेंदूवरही हल्ला; 5 वर्षांनी घटतंय आयुष्य

कोरोनाचा विषाणू (Coronavirus) मेंदूवरही मोठा परिणाम करतो आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या मेंदूचं आयुष्य 5 वर्षांनी कमी होत असल्याचं निरीक्षक वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे. कसे ओळखायचे परिणाम?

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात सध्या Covid-19 ची नवी प्रकरणं कमी होऊ लागली आहेत. तरी  धोका अद्याप टळलेला नाही. हा विषाणू किती धोकायदायक ठरू शकतो, याचे नवे दाखले समोर येत आहेत.  लशीविषयी चांगल्या बातम्या येत असल्या आणि या विषाणूं प्रादुर्भावाच्या आवाक्याने चिंता वाढली आहे. या व्हायरसविषयी वैज्ञानिक आणखी माहिती गोळा करत आहेत. त्यामधून काही धक्कादायक निरीक्षणं त्यांनी नोंदवली आहेत. Coronavirus केवळ फुप्फुसांवरच नाही तर मेंदूवर देखील परिणाम करत असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं. यामुळे प्रभावित व्यक्तीच्या मेंदूचं वय कमी होत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या आणि निरीक्षणं नोंदवणाऱ्या लखनौच्या आरएमएल हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. दीपक कुमार सिंह यांनी सांगितलं, "मेंदूचं वय कमी होणं चांगलं नाही.  मेंदू सक्षम राहणं हे निरोगी आयुष्याची पहिली आवश्यकता आहे. मेंदू कमजोर झाला की, अल्झायमर, पार्किन्सन आणि स्मृतिभ्रंशासारखे विकार होऊ शकतात. त्याचबरोबर कोरोनाच्या रुग्णांमध्ये स्ट्रोकचं प्रमाण देखील खूप जास्त असल्याचं समोर आलं आहे." कोरोनाच्या संसर्गाचा मेंदूवर परिणाम होतो आणि यामुळे मेंदूचं आयुष्य 5 वर्षांनी कमी होऊ शकतं, असं संशोधनातून समोर आलं आहे.  डॉ. दीपक यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितलं, "विषाणू थेट मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या इंडोलिथियमवर हल्ला करतो. यामुळे मेंदूत पातळ गुठळ्या तयार होतात आणि स्ट्रोक येतो. इंडोलिथिम रक्तवाहिन्यांमधे रक्ताच्या गुठळ्या होऊ न देण्याचं काम करत असतं. अशा परिस्थितीत, रुग्णाला 4 तासांच्या आत इंजेक्शन दिलं गेलं नाही तर त्याला वाचविणं अवघड होऊ शकतं. मेंदूवर जर काही प्रकारचा परिणाम झाला तर शरीराच्या  इतर भागांवर देखील याचा गंभीर प्रभाव पडतो."  मेंदूच्या पेशी शरीराच्या इतर अवयवांचं कार्य व्यवस्थित पार पाडण्याचं काम करत असतात. कोरोनाचा विषाणू याच पेशींवर आक्रमण करुन त्यांचा नाश करतो. त्यामुळे याचा परिणाम थेट मेंदूवर आणि शरीराच्या इतर अवयवांवरही होतो. दरम्यान, याआधी केलेल्या संशोधनात देखील मेंदूचं वय घटत असल्याचा दावा करण्यात आला होता.  लंडनमधील इंपिरिअल कॉलेजच्या डॉक्टर अॅडम हॅम्पशायर यांनी या संशोधनाचं नेतृत्व केलं होतं. यामध्ये हॅम्पशायर यांच्या टीमने एकूण 84,285 लोकांचा अभ्यास केला आहे. Great British Intelligence Test असे याला नाव देण्यात आले आहे. सध्या यातील निष्कर्ष जाणकारांनी तपासायचा असून MedRxiv या ऑनलाईन वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांमध्ये  substantial effect size फरक दिसून आलेला आहे. त्याचबरोबर अतिशय क्रिटिकल केसेसमध्ये 20 ते 70 वयोगटातील रुग्णांमध्ये मेंदूचे आयुष्य 10 वर्षांनी कमी होणार असल्याचे दिसून आले होते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Brain, Coronavirus

    पुढील बातम्या