रांची, 28 फेब्रुवारी : झारखंड राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अशावेळी अनेक आमदार देशातून कोरोना गेल्या प्रमाणे मास्क न घालताच विधानसभेत पोहोचले. कोरोनाची परिस्थिती पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आमदार मात्र या महासाथीकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक आमदार सहभागी होण्यासाठी मास्क न लावताच पोहोचले. यावर त्यांना सवाल केला असता ते विविध उत्तरं देऊ लागले. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही अनेकजणं मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
माजी मंत्री आणि भाजप आमदार अमर कुमार बाऊरी हे मास्क न लावताच अधिवेशनासाठी आले होते. यावर त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, मी कोरोनाची चाचणी केली आहे व ती निगेटिव्हही आली आहे. ते पुढे म्हणाले की, झारखंडमध्ये कोरोनाच्या शून्य केसेस आहेत. मी मास्क लावला नाही, हे चुकीचं आहे. असा दुर्लक्षितपणा करणं चुकीचं आहे. काँग्रेस आमदार अम्बा प्रसाद हे देखील मास्क न लावताच आले होते. ते म्हणाले की, SOP चं पालन आवश्यक आहे. कॅमेऱ्यात येण्यापूर्वी मास्क लावल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा-मोठी बातमी! खासगी रुग्णालयातही Corona Vaccine; अवघ्या 250 रुपयांत मिळणार एक डोस!
काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष इरफान अंसारी यांनी तर मास्क न लावण्यामागे विचित्र कारण सांगितलं. ते म्हणाले, मास्कमध्ये जीव गुदमरतो. आणि जास्त दिवस मास्क लावला तर फुप्फुसांवर परिणाम होतो. जामताडाचे आमदार इरफान अंसारी म्हणाले की, त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता, त्यामुळे पुढील तीन महिने कोरोनाची लागण होणार नाही.
झरियाच्या आमदार पौर्णिमा सिंह यादेखील मास्क न लावताच पोहोचल्या होत्या. भाजपचे आमदार भानुप्रताप शाही यांनी मास्क न लावण्यामागे कारण दिलं की, आवाज स्पष्ट येत नसल्याची तक्रार पत्रकारांकडून केली जाते, म्हणून त्यांनी मास्क लावणं टाळलं. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं चित्र आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. झारखंडमध्येही अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसत आहे. केवळ झारखंडचं नाही तर अनेक राज्यांमध्ये मोठ मोठ्या मंत्र्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे.