गेल्या वर्षभराहून अधिक काळ जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे मुखपट्टी अर्थात फेस मास्क (Face Mask) हा आपल्या रोजच्या जीवनाचा, वेशाचा अविभाज्य घटक बनला आहे. कधी एकदा कोरोना (Corona) कायमचा जातो आणि मास्कपासून सुटका मिळतेय, असं अनेकांना वाटत असेल. पण कोरोना गेला, तरी मास्क हा आयुष्याचा कायमचा भाग होऊ शकेल, असं शास्त्रज्ञांना वाटतंय. कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी राबवलेल्या बाकीच्या उपाययोजनांसह मास्कचा वापर या गोष्टीमुळे सर्दी किंवा फ्लूचा ताप आदी नेहमीच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारामध्ये कमालीची घट झाली असल्याचं निरीक्षण अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांच्या टीमने नोंदवलं आहे.
बॉस्टन मेडिकल सेंटर (Boston Medical Centre - BMC) या केंद्रातल्या शास्त्रज्ञांच्या चमूने एका वेगळ्या विषयावर संशोधन केलं. कोविड-19 (Covid19) महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा श्वसनविषयक अन्य सर्वसाधारण रोगांच्या नियंत्रणासाठी झालेला उपयोग असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यासाठी त्यांनी एक जानेवारी 2015 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीतल्या बीएमसीमधल्या आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागातल्या रुग्णांच्या माहितीचं विश्लेषण केलं. अर्थातच हे विश्लेषण श्वसनसंस्थेच्या विषाणूजन्य रोगांबद्दलचं होतं. सार्स सीओव्ही-टू अर्थात कोरोनाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट्स त्यातून वगळण्यात आले, जेणेकरून केवळ अन्य सर्वसाधारण श्वसनविषयक रोगांवरच लक्ष केंद्रित केलं जाऊ शकेल.
हे ही वाचा-'आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला?' संतप्त तरुणाचा आरोग्य सेविकेवर हल्ला
शास्त्रज्ञांनी सांगितलं, की 2020 या वर्षाचे दोन कालावधी ठरवण्यात आले. पहिला म्हणजे मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग, शाळा बंद करणं आदी उपाय राबवण्यापूर्वीचा आणि दुसरा कालावधी म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाल्यानंतरचा.
बॉस्टन मेडिकल सेंटरमध्ये संसर्गजन्य रोगविषयातले तज्ज्ञ आणि संशोधक म्हणून कार्यरत असलेले आणि या संशोधनात सहभागी असलेले शास्त्रज्ञ मनीष सागर यांनी याबद्दलची माहिती दिली. 'नेहमीचं सर्दी-पडसं, न्यूमोनिया (Pneumonia) यांसाठी कारणीभूत असलेले विषाणू जवळच्या संपर्कातून, धूलिकणांतून किंवा नाकातल्या स्रावाद्वारे पसरतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच कोविड-19ला प्रतिबंध करण्यासाठी राबवलेल्या उपायांचा या बाकीच्या रोगांवर कसा परिणाम होतो, ते पाहावं, असं आम्ही ठरवलं,' असं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा-Alert! पुढील 2 आठवड्यांत दिवसाला 1000 कोरोना बळी जातील; आरोग्य विभागाचा इशारा
या अभ्यासाचा अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, इन्फ्लुएंझा अर्थात फ्लू (Flu) आणि श्वसनविषयक अन्य सर्वसाधारण विषाणूजन्य रोगांचं प्रमाण वर्षाच्या आधीच्या कालावधीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी घटलं होतं. त्यामुळे श्वसनविषयक विषाणूजन्य रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांचा चांगला उपयोग झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे भविष्यातही त्या कारणासाठी या उपायांचा उपयोग करता येऊ शकेल.
2020मध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग वगैरे लागू केले जाण्याच्या आधीच्या कालावधीत विषाणूजन्य रोगांच्या प्रसाराचं प्रमाण 2015 ते 2019च्या तुलनेत जास्त होतं. तसंच, बॉस्टनमध्ये जुलै 2020मध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले, तेव्हा ऱ्हायनोव्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याचं लक्षात आलं.
'ज्यांच्यासाठी श्वसनविषयक संसर्ग अत्यंत हानिकारक ठरू शकतो, तसंच वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात, असं आमच्या अभ्यासातून दिसून आलं आहे,' असं मनीष सागर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी मास्कचा वापर फायदेशीर ठरू शकेल, असं त्यांनी सुचवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Mask