नवी दिल्ली, 28 जानेवारी : कोरोना व्हायरसची (Covid19) विविध लक्षणं जगभरात समोर येत आहेत. त्यानंतर आता कोरोनावर विविध संशोधनं देखील सुरू आहेत. जगभरात अनेक संस्थांमधे कोरोनावर संशोधन सुरु असून यामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात आणखी माहिती समोर आली असून कोरोना झालेल्या चारपैकी एका रुग्णाची जीभ जळजळ (Inflamed tongue) करत असून याला संशोधकांनी कोरोना जीभ (Corona Tongue) असं म्हटलं आहे. यामुळे कोरोनाच्या आणखी एक लक्षणांमध्ये भर पडली असून संशोधकांनी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसला (NHS) कोरोनाच्या अधिकृत लक्षणांमध्ये याचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
स्पेनच्या माद्रिदमधील युनिव्हर्सिटी ओ ला पाझ या हॉस्पिटलमधील वैज्ञानिकांनी हे संशोधन केलं आहे. कोरोनाच्या या कालखंडात त्यांनी विविध रुग्णांचे निरीक्षण करून हे मत मांडले आहे. 10 ते 25 एप्रिल 2020 या कालखंडात त्यांनी या रुग्णांचे निरीक्षण करून संशोधन केलं आहे. यामध्ये त्यांना विशेष लक्षणे आढळून आली असून हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ डरमॅटॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनात 26 टक्के रुग्णांना तोंडामध्ये रॅशेस पडत असल्याचे आढळून आलं आहे. याचबरोबर पायाला आणि हाताला देखील रॅशेस पडत असल्याचं या संशोधनात समोर आलं आहे. हात आणि पायाला रॅशेस पडणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी असून 46 टक्के इतकी आहे.
(वाचा - UK मधील नव्या कोरोनाला टक्कर देते भारतीय कोरोना लस; शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं)
कोरोना झालेल्या रुग्णांच्या जिभेवर पॅपिलायटीस (Papillitis) तयार होतो. यामुळे रुग्णाच्या जिभेवर एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो. 6.9 टक्के रुग्णांमध्ये सर्वात सौम्य लक्षणं म्हणजे तोंड येणं दिसून येतात. द सन मध्ये आलेल्या वृत्तानुसार, 6.6 टक्के रुग्णांमध्ये मेडिकल भाषेत ग्लोसिटिस (Glossitis) म्हणून ओळखली जाणारी जिभेची जळजळ देखील होते. यामध्ये जिभेला सूज आणि रंग बदल होत असल्याचे देखील दिसून आले आहे. चार टक्के रुग्णांच्या जिभेवर पांढऱ्या रंगाचा पडदा आढळून आला आहे. यामध्ये हाताची आणि पायाची त्वचा गळून पडणे हे सामान्य लक्षण आहे. यामध्ये 15 टक्के रुग्णांमध्ये हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवर लाल-तपकारी निशाण तयार होत असल्याचे दिसून आलं आहे.
(वाचा - वारंवार वापरत असलेला MASK बदलण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्यासाठी सोपी ट्रिक)
पहिल्यांदा आजारी पडल्यावर आणि लक्षणे जाणवू लागल्यावर सात टक्के रुग्णांमध्ये एरिथ्रोडायसीथेसियाची (Erythrodysesthesia) नोंद झाली. द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. अल्मुडेना नुनो-गोंझालेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांमध्ये दोन-आठवड्यांच्या कालावधीत सौम्य ते मध्यम लक्षणे जाणवू लागली. ओरल कॅव्हिटी देखील महत्त्वाची असून या संशोधनात त्यावर देखील लक्ष ठेवल्याची माहिती डॉ नूनो ‐ गोंजालेझ यांनी यावेळी दिली. किंग्ज कॉलेज लंडन (KCL) रोगतज्ज्ञ, प्राध्यापक टिम स्पेक्टर (Tim Spector) यांनी देखील अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी कोविड जीभ ग्रस्त झालेल्या रूग्णांची अनेक फोटो काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केले होते.