12 ते 18 वर्षांच्या युवकांवर लवकरच होणार कोरोना लशीची चाचणी, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचा मोठा निर्णय

12 ते 18 वर्षांच्या युवकांवर लवकरच होणार कोरोना लशीची चाचणी, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचा मोठा निर्णय

या कंपनीने सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 60 हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही वयोवृद्धांवर करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. ऑक्सफोर्डनंतर आता जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) च्या बैठकीत जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या अधिकाऱ्यानं एका महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

कंपनी लवकरच 12 ते 18 वर्ष वयोगटातील तरुणांवर कोरोना लशीची चाचणी करण्यासंदर्भात विचार करत आहे. या बैठकीत जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचे डॉ. जेरी सेडॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेचे सर्व निकष डोळ्यासमोर ठेवून युवक आणि लहान मुलांवर कोरोनाच्या लशीची चाचणी करण्यासाठी नियोजन आखण्यात आलं आहे.

या कंपनीने सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 60 हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही वयोवृद्धांवर करण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्यामुळे ही चाचणी काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. मात्र एका आठवड्यापूर्वी पुन्हा एकदा चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून आता ही कंपनी लहान मुलांवर कोरोनाच्या लशीची चाचणी करण्याच्या विचारात आहे.

हे वाचा-कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट, या देशानं 6 महिन्यांसाठी जाहीर केली हेल्थ इमरजन्सी

सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीला आपत्कालीन म्हणजेच इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली तर ही लस डिसेंबर महिन्यापर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकेल असाही कयास आहे. जगभरात 30 हून अधिक लशीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. सर्व सुरक्षा आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन या चाचण्या होत आहेत. रशियाची लस वगळता आता आणखीन कोणती लस लवकरच येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 31, 2020, 10:23 AM IST

ताज्या बातम्या