नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : मेड इन इंडिया असलेल्या भारत बायोटेक कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे Covaxin ची माकडांवर चाचणी यशस्वी झाली. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.
भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली आहे. भारत बायोटेकने मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर ही चाचणी केली. पहिल्या टप्प्यातील कोरोनाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी भारत बायोटेक कंपनीने DCGI कडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
Bharat Biotech proudly announces the animal study results of COVAXIN™ - These results demonstrate the protective efficacy in a live viral challenge model.
भारत बायोटेक कंपनीनं पहिल्या टप्प्यात 12 शहरांमध्ये कोरोना लशीची चाचणी केली. त्यामध्ये 375 लोकांनी सहभाग घेतला होता. भारतात आतापर्यंत तीन लशींवर सध्या काम सुरू आहे. सीरम इंन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांच्या भागीदारीतून तयार करण्यात येणाऱ्या लशीची मानवी चाचणी देखील भारतात सुरू आहे.
एका रिपोर्टनुसार भारत बायोटेक कंपनीने DCGI ला मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला परवानगी देण्यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. DGCI च्या डॉक्टर एस. एश्वर्या रेड्डी यांनी 380 लोकांवर ही चाचणी करण्यासंदर्भात योजना सुचवली आहे. तीन चाचण्यांपैकी पहिल्या चाचणीत यश मिळाल्यानंतर दुसरा टप्पा कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.