मुंबई 10 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येचा (Corona Cases) नवीन उच्चांक समोर येत आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लसीकरण (Corona Vaccine) हा महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. सरकारनंही एक मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, लसीच्या किमतीवरुन (Vaccine Price) अजूनही वाद सुरू आहे. खासगी केंद्रांना 250 रुपयात दिल्या जाणाऱ्या लसीचे दर आता जवळपास सहा पटीनं वाढवले गेले आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दर 700 ते 900 रुपये तर भारत बायोटेकनं (Bharat Biotech) कोव्हॅक्सिनचे (Covaxin) दर 1250 ते 1500 इतके केले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, CoWIN वेबसाईटवरुन अशी माहिती मिळते, की आतापर्यंत लसीकरणासाठी खासगी क्षेत्रातील चार कॉर्पोरेट रुग्णालयच समोर आले आहेत. यात अपोलो, मॅक्स, फोर्टिस आणि मणिपाल यांचा समावेश आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोना लसीच्या दराबाबत एकरुपता नाही. भारतही त्यातीलच एक आहे. कोरोनाचा कहर वाढत असतानाही देशातील बहुतेक जनता स्वतःचे पैसे खर्च करुन लस घेण्यासाठी उत्सुक नाही. याच सर्वात महत्त्वाचं कारण आहे, देशात खासगी केंद्रामध्ये वाढलेली लसीची किंमत.
भारतात जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली होती. तेव्हा केंद्र दोन डोससाठी 150 रुपयांमध्ये लसीचे डोस घेत होतं आणि राज्य सरकार तसंच खासगी रुग्णालयांना याचा पुरवठा करत होतं. इतकंच नाही तर खासगी रुग्णालयांमध्ये प्रति डोस १०० रुपये घेण्याची परवानगी देण्यात आली होती. यावर खासगी रुग्णालयांनी परवानगीही दिली होती. मात्र, अनेक रुग्णालय लसीकरणासाठी 250-300 रुपये प्रति डोस आकारत होते.
मॅक्स रुग्णालयाच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं, की आतापर्यंत कोविशिल्डची किंमत 660-670 रुपये होती, यात जीएसटी आणि इतर खर्चही सामील होते. त्यांनी सांगितलं, की जेव्हा लस मागवली जाते, तेव्हा त्यातील पाच ते सहा टक्के लस खराब होते. अशात तिची किंमत 710 ते 715 रुपये होत असते. याशिवाय जे कर्मचारी ही लस देत असतात त्याच्यासाठी पीपीई किट, सॅनिटायझर, बायोमेडिकलची व्यवस्था करावी लागते. यासाठी 170 ते 180 रुपयांपर्यंतचा खर्च येतो. अशात एका लसीची किंमत 900 रुपयांपर्यंत जाते.
त्यांनी सांगितलं, की आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही की रुग्णालयांना लस किती रुपयांना दिली जाईल. भारत बायोटेकनं लसीची किंमत 1,200 रुपये प्रति डोस ठरवली आहे, तर सिरमनं 600 रुपये प्रति डोसची घोषणा केली आहे. मात्र, दोन्ही कंपन्या आता दुप्पट किमतीनं राज्यांना ही लस देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost