मुंबई, 16 जानेवारी : जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला (Coronavirus vaccination) सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ही मोहीम सुरु केली. आता संपूर्ण देशभरात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी देशात 3006 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) विरुद्धच्या लढाईतील निर्णायक टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. यासाठी देशभरात काय तयारी करण्यात आली आहे, पाहूया
महाराष्ट्रात सुरुवात
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुंबईतील बीकेसीमधील विशेष कार्यक्रमात त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, जालनासह इतर भागात लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात हे लसीकरण केलं जाईल. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणार आहे. 'आपल्या तोंडावर असलेला मास्क ही उत्तम लस आहे, लस घेतल्यानंतरही मास्क बंधनकारक आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
(हे वाचा- 'अफवांवर विश्वास ठेवू नका..', कोरोना लशीबाबत पंतप्रधानांचं जनतेला आवाहन)
उत्तर प्रदेशात 31,700 जणांचं लसीकरण
उत्तर प्रदेशमध्ये आज (शनिवारी) दिवसभरात 31,700 जणांचं लसीकरण करण्यात येणार आहे, त्यासाठी राज्यात 10 लाख 55 हजार 500 कोविशिल्ड आणि 20 हजार को व्हॅक्सिन उपलब्ध आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी 8 लाख 57 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यातील 317 केंद्रावर ही मोहीम राबवण्यात येईल असं आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितलं.
बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
बिहारमध्ये लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 हजार जणांची नोंदणी करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार (NItishkumar) यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेला सुरुवात होईल. कोरोना लशीचा पहिला डोस हा स्वच्छता कर्मचारी रामबाबू आणि दुसरा डोस हॉस्पिटलमधील रुग्णवाहिकेचे चालक अमित कुमार यांना देण्यात येईल. बिहारमध्ये लसीकरणासाठी 300 सेंटर तयार करण्यात आले आहेत.
उत्तराखंडामध्येही सुरुवात
उत्तराखंडमधील 33 आरोग्य केंद्रावरही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. राज्यातील डेहराडून, हरिद्वार, युएसनगर नैनिताल या चार शहरांमध्ये ही प्रक्रिया होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 87 हजार कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणार आहे.
मध्य प्रदेशात जेपी हॉस्पिटलमध्ये होणार सुरुवात
मध्य प्रदेशात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला लशीचा पहिला डोस देण्यात येईल. जेपी हॉस्पीटलमध्ये याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी हरिदेव यादव या सुरक्षा रक्षकाची निवड करण्यात आली आहे. इंदूरमध्ये लशीचा पहिला डोस हा महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine