देहरादून, 20 डिसेंबर : जगभरात कोरोनाचं थैमान अजूनही सुरूच आहे. पण भारतात अनेक लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसत आहे. सध्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येनं 1 कोटीचा टप्पा पार केला आहे. असं असताना लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. नुकतच एका लग्नात नवरी सोडून बाकी सर्व कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उत्तराखंड राज्यातील देहरादूनमध्ये महिनाभरापूर्वी एक लग्न पार पडलं होतं. आता या लग्नात सामील झालेल्या अनेकांना कोरोना विषाणूनं घेरलं आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे दोन वृद्ध लोकांचा मृत्यूही झाला आहे. डोईवाला येथे पार पडलेलं हे लग्न कोरोनाचं 'सुपर स्प्रेडर' फंक्शन असल्याचं सिद्ध झालं आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, वरासोबत आणखी 28 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे. सध्या आरोग्य विभागाचे अधिकारी या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा लग्नात उपस्थित असणाऱ्यापैकी एकानं कोविड विषाणूची तपासणी केली.
आरोग्य अधिकारी डॉ. आर के दिक्षित यांनी सांगितलं, की आम्ही कोरोनाची लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी केली. तेव्हा त्यातील तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं. नंतर आम्हाला समजलं की या 3 लोकांनी 10 डिसेंबर रोजी डोईवाला येथील लग्नाच्या एका रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. मग आम्ही वराच्या कुटुंबाची आणि इतर उपस्थितांची चाचणी केली. त्यानंतर नवरी मुलगी सोडून वराच्या कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे.
यामध्ये विशेषतः मुलाचे आई-वडील, बहीण, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि वधूची आजी अशा सर्वांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. नवऱ्या मुलाचे काका थेट रुग्णालयातून लग्नासाठी आले होते. हे या संसर्गाचे स्त्रोत असू शकतात असा संशय आहे.