नवी दिल्ली, 15 जानेवारी : कोव्हिड 19 वरील (Covid 19) अत्यंत प्रभावी लस (Vaccine) बनवण्याच्या बाबतीतील भारताचं (India) कौशल्य बघून लस निर्मितीच्या क्षेत्रात भारत हा शक्तीशाली देश असल्याचं आता सगळ्या जगानं मान्य केलं आहे. याबाबतीत भारतानं चीनच्याही (China) पुढं आघाडी घेतल्याचं चीनमधील वृत्तपत्रं आणि तज्ज्ञांनी कबूल केलं आहे. जगभरात भारतानं बनवलेल्या लशीची मागणी वाढत आहे. अनेक देशांनी चीनच्या ‘सायनोव्हॅक’ कंपनीनं तयार केलेल्या ‘कोरोना व्हॅक’ लशीसाठी नोंदवलेली मागणी मागं घेण्यास सुरुवात केली आहे आणि भारतातील लशीची मागणी केली आहे.
ही वस्तुस्थिती आहे की जगात वापरल्या जाणार्या निम्म्याहून अधिक लशी भारतात तयार केल्या जातात. कोरोना लशीच्या बाबतीतही भारत जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे. जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश ठरला आहे. कोरोना लसीच्या निमित्तानं भारतानं या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचं मानलं जात आहे.
ब्राझील (Brazil) आतापर्यंत चीननं तयार केलेली कोरोना लस वापरत होता; पण आता भारतानं त्यांना कोव्हिशिल्ड (Covishield) ही लस पुरवावी अशी त्यांची इच्छा आहे. जगातील अनेक देशांनी कोव्हिशिल्डची मागणी केली आहे. एक डझनपेक्षा अधिक देशांनी भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित कोव्हॅक्सिन (Covaxin) खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
जगातील सर्व देशांच्या माध्यमांनी लशीच्या क्षेत्रातील भारताचं वर्चस्व मान्य केलं आहे. लस तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानावर असल्याचं प्रत्येकजण मान्य करत आहे. चीनमधील या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) दर्जेदार लस तयार करत असल्याचं आणि त्यांची उत्पादन क्षमताही प्रचंड असल्याचं मान्य केलं आहे.
भारतात दोन कोरोना लशींना मंजुरी
भारतात आतापर्यंत दोन लशींना मान्यता मिळाली आहे, ती म्हणजे कोव्हीशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन(Covaxin). पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्रॅजेनेकाच्या मदतीनं कोव्हीशिल्ड (Covishield) ही लस तयार केली आहे. सीरममध्ये सध्या रात्रंदिवस लस उत्पादन करण्यात येत आहे. देशांतर्गत मागणीसह जगभरातील अनेक देशांनी सीरमकडं या लशीची मागणी नोंदवली आहे.
हे वाचा - इच्छा असूनही तुम्हाला इतक्यात घेता येणार नाही Corona vaccine कारण...
तर कोव्हॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची लस भारत बायोटेक कंपनीनं निर्माण केली असून, ही लस 90 टक्के सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या लसीला ब्रिटन आणि अमेरिकेसह जगभरातूनही मागणी येत आहे. भारत बायोटेककडं केवळ प्रचंड संशोधन सुविधा नाहीत, तर त्याची उत्पादन क्षमताही प्रचंड मोठी आहे. यापूर्वीही भारत बायोटेकनं अनेक रोगांवरील औषधं विकसित केली असून, जगभरात मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर केला जात आहे.
चीनची लस का मागे पडली?
ब्राझीलसह अनेक विकसनशील देशांनी चीनच्या कोरोना लशीसाठी ऑर्डर दिली होती. ही लस बनवणारी सायनोव्हॅक ही सरकारी कंपनी असून ती बीजिंगमध्ये आहे. ही लस केवळ स्वस्त दरातच विकण्यात आली नाही तर इतर लशी येण्यापूर्वीच ती तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आता या लशीबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
चीननं तयार केलेली लस जुन्या तंत्रज्ञानाद्वारे बनवली आहे. ही लस रसायनांनी बनविली जाते. हे जुने तंत्रज्ञान विषाणूला कमकुवत किंवा नष्ट करण्याचे कार्य करते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती घटते किंवा तिचा प्रतिसाद कमी होतो. अमेरिका, युरोप आणि भारतात तयार केलेल्या लसी एमआरएनए तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निर्माण करण्यात आली आहे.
हे वाचा - ब्रिटिश नको पुणेरी हवी; भारतातील कोरोना लशीला जगात मागणी
पण गेल्या आठवड्यात जेव्हा ब्राझीलनं या लशीची आपल्या देशातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली आणि ज्यांना ही लस देण्यात आली आहे, त्यांच्यावरील परिणाम जाणून घेतले तेव्हा चीनची लस फारच कमी गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं. ब्राझीलचे शास्त्रज्ञ म्हणतात की, चिनी लस केवळ 50 टक्के प्रभावी आहे. हा निष्कर्ष येताच ज्या देशांनी या लशीची मोठी मागणी नोंदवली होती, त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी बर्याच देशांनी भारताला लस पुरविण्याची विनंती केली आहे.
चीननंही स्वीकारलं भारताचं वर्चस्व :
कोरोना लसबाबत प्रथमच चीननं भारताचं कौशल्य आणि उत्पादन क्षमतेचं वर्चस्व मान्य केलं आहे. ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार चिनी तज्ज्ञ जिआंग चुनलाय यांनी म्हटलं, "भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ती केवळ उत्कृष्ट पद्धतीनं लस निर्माण करते असं नाही तर पुरवठा करण्याची तिची क्षमतादेखील मोठी आहे. या प्रकरणात पाश्चिमात्य देशांपेक्षा ही कंपनी आघाडीवर आहे. भारतीय लस उत्पादकांनी फार पूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था जीएव्हीआय, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, दक्षिण अमेरिकेतील पीएएचओ आदी संस्थांशी करार केले आहेत"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona, Corona vaccine, Corona virus in india, India china, Vaccination, Vaccine