फक्त मास्क आणि सॅनिटायझर नाही कोरोनापासून बचावासाठी दातही घासा!

फक्त मास्क आणि सॅनिटायझर नाही कोरोनापासून बचावासाठी दातही घासा!

कोरोना (corona) पासून बचाव व्हावा यासाठी आपण मास्क, सॅनिटायझरचा वापर करतो. पण कोरोनापासून स्वत:ला दूर ठेवायचं असेल तर तुमचे दात टूथपेस्टने घासा. काय आहे यामागचा अभ्यास जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर: कोरोना व्हायरस (Corona Virus)पासून वाचण्यासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लसींवर संशोधन सुरु असून विविध उपाय आणि मार्गदेखील शोधले जात आहेत. यामध्ये सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे. परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एवढंच करणं पुरेसं नसल्याचं ब्रिटिश डेंटिस्टने म्हटले आहे.

ब्रिस्टॉल विद्यापीठातील दंतवैद्यक शास्त्रातील प्राध्यापक मार्टिन अ‍ॅडी यांनी कोरोनाच्या काळात हात धुण्याबरोबरच दात घासणंदेखील महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. ब्रिटनमधील टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे मत मांडलं. साबणात आणि हॅन्डवॉशमध्ये असणारे डिटर्जन्टस टूथपेस्टमध्ये देखील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्हायरसपासून तुमच्या तोंडाचे देखील संरक्षण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील मिररने टेलिग्राफच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. यामध्ये टूथपेस्टची antimicrobial प्रक्रिया 3 ते 5 तास राहत असल्याने कोरोना व्हायरसचा धोका कमी होत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये नागरिकांनी घराबाहेर जाण्याच्या आधी ब्रश करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जायचं असल्यास नागरिकांनी दात घासण्यावर लक्ष केंद्रित करणंदेखील गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एप्रिलमध्ये त्यांनी लिहिलेलं पत्र ब्रिटीश डेंटल जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं. यामध्ये त्यांनी डेंटल कम्युनिटीला प्रश्न केला आहे की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दात घासणंही गरजेचं आहे. याबाबतीत त्यांची भूमिका खूपच कडक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार सर्व देशांनी आपल्या नागरिकांना स्वच्छ हात धुण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यामध्ये दिवसातून 2 वेळा दात घासण्याच्या पद्धतीचादेखील समावेश करावा अशी मागणी अ‍ॅडी यांनी केली आहे. यासाठी सरकारने, डेंटल व्यवसायातील व्यक्तींनी आणि माध्यमांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे त्यांच्यासाठी ही पद्धत उपयोगाची असल्याचेदेखील मार्टिन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दात घासल्यामुळे कोरोनापासून संरक्षण होते हे कोणत्याही संशोधनात सिद्ध झालेले नाही. परंतु बेसिक हायजिनसाठी हे फार गरजेचं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 22, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या