लशीचा बूस्टर डोस कोरोनावर मात करेल का? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

लशीचा बूस्टर डोस कोरोनावर मात करेल का? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

काही देश आणि काही औषध कंपन्या कोरोना विषाणूच्या अधिक संसर्गजन्य व्हेरियंटला आटोक्यात आणण्यासाठी लशीच्या बूस्टर शॉटची (Booster Shot) तयारी करत आहेत

  • Share this:

नवी दिल्ली 21 जून : जगातल्या जवळपास सर्वच देशांत सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Anti Covid Vaccination) मोहीम सुरू आहे. त्यासोबतच काही देश आणि काही औषध कंपन्या कोरोना विषाणूच्या अधिक संसर्गजन्य व्हेरियंटला आटोक्यात आणण्यासाठी लशीच्या बूस्टर शॉटची (Booster Shot) तयारी करत आहेत; मात्र काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते बूस्टर शॉट खरंच आवश्यक आहे का, याबद्दल सांगणं घाईचं ठरेल. जगभरातले शास्त्रज्ञ मिक्स अँड मॅच लसीकरणाच्या पर्यायावरही विचार करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन (Saumya Swaminathan) यांनी सांगितलं, 'कोरोनाप्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसची गरज आहे की नाही, याबद्दलच्या शिफारशीबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. याबद्दलच्या विज्ञानात सातत्याने विकास होत आहे. जगातल्या बहुतांश भागांत अद्याप कोरोनाचा धोका असलेल्या लोकांचंही लसीकरण पूर्ण झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर बूस्टर डोसची चर्चा खूपच लवकर आणि घाईघाईने सुरू झाली आहे,' असं स्वामिनाथन यांनी सांगितलं.

थंडीच्या दिवसांत कोरोना संसर्गग्रस्तांच्या संख्येत ब्रिटनमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तिथे कोरोना लशीचा बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे. तिथले आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं, की बूस्टर डोससंदर्भातल्या जगातल्या पहिल्या अभ्यासांतर्गत इंग्लंडमध्ये स्वयंसेवकांवर सात वेगवेगळ्या लशींच्या चाचण्या केल्या जात आहेत.

कोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे?

मिक्स अँड मॅच लसीकरण (Mix & Match Vaccination) अर्थात दोन्ही डोस वेगवेगळ्या लशींचे घेण्यासंदर्भातही सौम्या स्वामिनाथन यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 'मिक्स अँड मॅच लसीकरण कोरोना व्हेरियंटविरोधात अधिक उपयुक्त ठरू शकतील. ज्या देशांनी बहुतांश नागरिकांना लशीचा पहिला डोस दिला आहे, त्या देशांत दुसरा डोस वेगळ्या लशीचा देणं हे चांगलं पाऊल ठरेल,' असं त्या म्हणाल्या.

ब्रिटन, स्पेन आणि जर्मनी या देशांतून मिळालेल्या माहितीनुसार, मिक्स अँड मॅच लसीकरण केल्यास लोकांना जास्त वेदना होतात, अधिक ताप येतो, तसंच छोट्या साइड इफेक्ट्सचं (Sid Effects) प्रमाण अधिक असतं.

Corona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला

स्पेन आणि ब्रिटनमध्ये  मिक्स अँड मॅच (Mix & Match Vaccination) लसीकरणाच्या चाचण्या सुरू आहेत. त्या चाचण्यांचे प्राथमिक निष्कर्ष दिलासादायक आहेत. एकाच लशीच्या दोन डोसेसच्या तुलनेत दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतले, तर शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होऊ शकतात, असे संकेत त्यातून मिळाले आहेत.

लॅन्सेट या जर्नलमध्ये मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, वेगवेगळे डोस दिलेल्या व्यक्तींना सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणं दुसऱ्या डोसनंतर दिसून आली. त्यात थकवा, ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आदींचा समावेश होता.

Published by: Kiran Pharate
First published: June 21, 2021, 4:26 PM IST

ताज्या बातम्या