लस घ्या आणि 2 किलो टोमॅटो मोफत मिळवा; प्रशासनाच्या भन्नाट ऑफरमुळे लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा

लस घ्या आणि 2 किलो टोमॅटो मोफत मिळवा; प्रशासनाच्या भन्नाट ऑफरमुळे लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा

महागाईनं त्रासलेल्या सामान्यांना दैनंदिन वापराची वस्तू दिली तरच ते लस घ्यायला येतील, हे लक्षात घेऊन बीजापूर जिल्ह्यातील कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) वितरण केंद्रांवर नागरिकांनी लस घेतल्यावर त्यांना 2 किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 21 एप्रिल: कोरोना महामारीनं (Covid Pandemic) गेलं पूर्ण वर्ष कठीण परिस्थितीत गेलं. आता त्याची दुसरी लाट आली आहे आणि भारतात दररोज नव्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात विविध लसींना सरकारने परवानगी दिली आहे. कोरोना रोखण्यासाठी लस घेणं (Vaccination) हा पहिला उपाय आहे त्याचबरोबर मास्क वापरणं (Wearing Mask), सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), हात सॅनिटाइज करणं हे पाळत राहायला हवं. लसीकरण सुरू झालं असलं तरीही लसीबद्दल समाजात काही गैरसमज पसरवले गेल्यामुळे लोक ती घेण्यासाठी पुढे येत नाहीत असं लक्षात आलं.

हे आपल्या भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या प्रगत देशापासून ते नेपाळसारख्या गरीब देशापर्यंतचं चित्र आहे. मग सुरू झालं लस घेण्यासाठी नागरिकांना आमिष दाखवणं. जगभरात लस घेतल्यावर आईस्क्रीम, मोफत जेवण आणि काही वस्तू दिल्या जात आहेत. छत्तीसगड राज्यातल्या बीजापूर (Bijapur District Adminstration) जिल्हा प्रशासनानं मात्र एक नामी शक्कल लढवली आहे. महागाईमुळे त्रासलेल्या सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन वापराची वस्तू दिली तरच तो लस घ्यायला येईल हे लक्षात घेऊन बीजापूर जिल्ह्यातील सर्व कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) वितरण करणाऱ्या हॉस्पिटल आणि केंद्रांवर नागरिकांनी लस घेतल्यावर त्यांना 2 किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत.

या भन्नाट ऑफरमुळे लोक लस घ्यायला येत आहेत. याबाबत जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी पुरुषोत्तम सल्लुर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला (ANI) माहिती दिली. ते म्हणाले,‘बीजापूर जिल्ह्यातल्या ज्या-ज्या हॉस्पिटल आणि केंद्रांतून कोविड-19 लस दिली जात आहे त्या सर्व केंद्रांवर लस घेणाऱ्याला 2 किलो टोमॅटो (2 Kg Tomatos) मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामुळे लोक लसीकरणाकडे आकर्षित होत आहेत. आम्ही भाजी विक्रेत्यांना आवाहन केलं आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांना टोमॅटोचा पुरवठा करत आहेत.’

या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याने सरकारचे सगळेच प्रयत्न वाया जात नाहीत एवढं तरी स्पष्ट होतं आहे. कारण मोफत टोमॅटोंच्या आशेने तरी लोक लसीकरण करून घेत आहेत. सध्या बाजारात 40 रुपये किलो टोमॅटो आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी रांगा लावून लोक लस आणि 2 किलो टोमॅटो घेऊन जात आहेत. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) मंगळवारी घोषणा केली की वयाची 18 वर्षं पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला 1 मे 2021 पासून लस देण्यात येणार आहे. खासगी हॉस्पिटलमधूनही लोक लस टोचून घेऊ शकतात तसंच राज्य सरकारही लस उत्पादकांकडून लस विकत घेऊ शकतात असंही केंद्रानं जाहीर केलं.

दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून भारतात अंदाजे दर तासाला नवे 10 हजार रुग्ण सापडत असून 60 जणांचा मृत्यू होत आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या