कॅनडा, 10 डिसेंबर: गेल्या डिसेंबरपासून जगभर कोरोना साथीचा (Corona Pendemic) हाहाकार सुरूच आहे. कोरोना विषाणूच्या संपर्कात आलेले बरेचसे लोक बरे होत आहेत. भारतातही रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. पण तरीही या गंभीर आजारामुळे मृत्युमुखी (Corona Deaths) पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोरोना मृत्यू हा अजूनही जगभरात चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांच्यात गुंतागुंतीचे आजार दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे कित्येक महिनेही उपाचारांसाठी लागत आहेत. कॅनडात असंच एक प्रकरण समोर आलं.
कॅनडामधील (Canada) एका महिलेचं प्रकरण काहीसं वेगळच आहे. तिला नऊ महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ती अजूनही कोरोनाच्या आजारातून मुक्त होऊ शकली नाही. कॅनडाच्या या 35 वर्षीय महिलेचं नाव अॅशले अँटोनियो (Ashley Antonio) असं आहे. ती गेल्या 9 महिन्यांपासून कोरोनामुळे त्रस्त आहे. इतके दिवस उलटून गेल्यानंतरही कोरोनाने तिचा पिच्छा सोडला नाही.
तिचं असं म्हणणं आहे, की कोरोना मला कधीही सोडणार नाही. अँटोनियो यांना डोकेदुखी, फुफ्फुसांचा आजार, चक्कर येणे, हृदय जोरात धडधडणे आणि सांधेदुखीसह विविध प्रकारचे गुंतागुंतीचे आजार आहेत. अँटोनियो यांनी पुढे सांगितलं की 'कधीकधी मला बरं वाटतं आणि अचानक मला श्वासही घेता येत नाही आणि मी हालचाल करू शकत नाही. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून लवकरच त्या बऱ्या होतील अशी आशा आहे.
जगभरातील कोरोनाची प्रकरणे
सध्या जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 19,673,043 एवढी आहे. मागील वर्षी चीनमध्ये पहिल्यांदा विषाणूचा संसर्ग वाढला होता. त्यानंतर अगदी वाऱ्याच्या वेगात हा विषाणू जगभर पसरला. या विषाणूमुळे आतापर्यंत 1,575,773 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जगभरातील 69,234,626 लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 4,79,462 लोक बरे झाले आहेत. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सर्वाधिक रुग्णं आढळली आहेत. पण अलिकडेच कोरोना विषाणूची लस आल्याच्या बातमीने आशेचा किरण दाखवला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 15,820,042 च्या वर गेली आहेत तर अमेरिकेत आतापर्यंत 296,698 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.