वॉशिंग्टन, 15 जानेवारी : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत आहे. त्याचवेळी अमेरिकेत (United States) मात्र याचा धोका कमी झालेला नाही. गेल्या दहा दिवसांमध्ये अमेरिकेत 2 लाख जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. नव्या वर्षातील पहिल्या दोन आठवड्यात तब्बल 38 हजार नागरिकांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या सर्व काळजीच्या घडामोडीनंतर आणखी एक भीतीदायक इशारा सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेनं एक महत्त्वाचा इशारा आहे.
काय आहे इशारा?
‘अमेरिकेत येत्या 3 आठवड्यात सुमारे 90 हजार जणांचा कोरोनामुळे (Covid-19) मृत्यू होईल असा इशारा CDC या संस्थेनं दिला आहे. अमेरिकेतील एका अन्य सर्वेक्षणानुसार कोरोनामुळे देशातील नागरिकांचं सरासरी आयुष्य एक वर्षांनी कमी झालं आहे. सध्या अमेरिकेतील नागरिकांचं सरासरी आयुष्यमान 77.48 आहे. 2003 नंतर 18 वर्षांनी हा आकडा सर्वात कमी आहे. सध्या अमेरिकेतील 1 लाख 30 हजार 300 जण कोरोनामुळे विविध हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. अनेक राज्यात कोरोना पेशंट्सची संख्या दुप्पट झाली आहे.
(हे वाचा- जिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला)
जनावरांनाही कोरोना!
अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. कोरोना पेशंट्सची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यातच जनावरांनाही कोरोना झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली आहे. अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील दोन गोरिलाचे रिपोर्ट चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबऴ उडाली. तर तिसऱ्या गोरिलामध्ये कोरोनाची सर्व लक्षणं आढळून आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्या संपर्कात गोरिला आल्यानं त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बेरोजगारीत मोठी वाढ
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे बेरोजगारीचा दावा करणाऱ्या व्यक्तींची संख्या गेल्या आठवड्यात 9 लाख 65 हजार झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर ही सर्वात जास्त आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली. त्यामुळे बरोजगारांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती श्रम विभागानं दिली आहे. कोरोना महामारीच्यापूर्वी अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या 2 लाख 25 हजारांच्या जवळपास होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, United States of America