नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या कोव्हिड -19 लसीकरण मोहिमेला (Coronavirus Vaccination Drive) सुरुवात करत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुरुवातीला तीन कोटी लोकांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी 3 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड -19 ही लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10.30 वाजता या मोहिमेला सुरुवात केली आहे. यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकूण 3006 लसीकरण केंद्रे असणार असून ही सर्व केंद्रे व्हर्चुअली एकमेकांना जोडली जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी जवळपास 100 लाभार्थ्यांना ही लसी देण्यात येणार आहे.
भारतात मंजुर झालेल्या लशी आणि त्यांची किंमत
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोएनटेकच्या कोव्हॅक्सीनला भारत सरकारने मान्यता दिली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचा एक डोस भारतात 200 ते 295 रुपयांपर्यंत असू शकतो. तर बाजारात याची किंमत एक हजार रुपयांच्या आसपास असू शकते, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सांगितली.
लशीचे काही दुष्परिणाम आहेत का?
आरोग्य मंत्रालयाने (Mohfw) दोन्ही लशीबाबत सौम्य दुष्परिणामांचा इशारा दिला आहे. कोविशिल्डच्या बाबतीत वेदना, डोकेदुखी, थकवा, मायलागिया, पायरेक्सिया, थंडी वाजून येणे , आर्थ्राल्जिआ आणि मळमळ यांसारखे काही दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. कोव्हॅक्सीनच्या बाबतीत सांगायचे झाले तर, इंजेक्शन टोचलेल्या ठिकाणी थोडी वेदना, डोकेदुखी, थकवा, ताप, पोटात दुखणे, मळमळ, उलट्या होणे, चक्कर येणे, थरथरणे, घाम येणे, सर्दी, खोकला आणि सूज येणे, असे विविध दुष्परिणाम कोव्हॅक्सीनचे असू शकतात. लसीकरणाच्या वेळी पहिला डोस ज्या लसीचा घेतला होता, त्याच लशीचा डोस दुसऱ्यांदा घ्यावा लागणार आहे. दोन्ही लशीचे एकत्रित डोस घेता येणार नाहीत.
CO-WIN App काय आहे?
CO-WIN हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जो कोव्हिड-19 लशीच्या वितरणासाठी खास पद्धतीनं डिझाइन केला आहे. या सुविधेचा वापर करुन लोकं स्वतः लसीकरणासाठी नोंदणी करू शकतात. पण ही सुविधा अस्तित्वात आणण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. कारण सध्याच्या लसीकरणाच्या मोहिमेत केवळ आरोग्य कर्मचाऱ्यासोबतच 3 कोटी लोकांचा समावेश असणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर वरून डाऊनलोड करता येणार आहे. शिवाय लवकरच हे अॅप जिओ फोन वर देखील लॉंच होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.