धोका वाढला ! दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट तीव्र; परिस्थिती आणखी बिघडणार?

धोका वाढला ! दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट तीव्र; परिस्थिती आणखी बिघडणार?

दिल्लीत कोरोना विषाणू (Corona Virus)ची दुसरी लाट तीव्र झाली आहे. येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

  • Share this:

 नवी दिल्ली, 02ऑक्टोबर : भारतामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यामध्ये घट होत आहे, परंतु दिल्लीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीत गेल्या एका आठवड्यापासून दररोज 5 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट देशात आली आहे की काय याबद्दल बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. एम्सचे निदेशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याचं स्पष्ट खंडन केलं आहे. डॉ. गुलेरिया म्हणतात की, "आताचे आकडे पाहून तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल बोलू शकत नाही. आपण या परिस्थीला असं म्हणू शकतो की कोरोनाची ही दुसरी लाट आहे, जी सौम्य झाली होती ती आता पुन्हा एकदा तीव्र झाली आहे."

गुलेरिया म्हणाले की, "आता कोरोनाबद्दल लोकांमध्ये बेफिकिरी दिसून येत आहे, सण आणि समारंभ तसंच पार्टी या कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जात नाही. आणि लोकही मास्कशिवाय बाजारात फिरताना दिसत आहेत. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. कोरोनाची साथ संपल्याचं लोकांना वाटू लागले आहे. पण कोरोना आता कुठे अर्ध्या मार्गावर पोहोचला आहे हे समजून घ्यायला हवं. दिल्लीतल्या लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे आता कोरोनाने पुन्हा एकदा दिल्लीत डोकं वर काढलं आहे. अशा वेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचे असेल तरच घराबाहेर निघा आणि बाहेर निघाल्यावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करा."

डॉ, गुलेरियांच्या म्हणण्यानुसार, "थंडी वाढताच कोरोना विषाणू अधिक धोकादायक होईल, हा विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहू शकेल ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आणखी वाढू शकते." एम्सच्या निदेशकांनी मान्य केलं की, वाढत्या प्रदूषणामुळे व्हायरस आणखी धोकादायक होऊ शकतो. ते म्हणाले की कोरोना विषाणूचं संक्रमण आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींमुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. पुढे ते असे म्हणाले की, आपल्याला थंड हवामानात अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग हा बराच वाढू शकतो.

प्रदूषणामुळे संसर्ग वाढतो

डॉ. गुलेरिया म्हणाले की, "थंडीमध्ये जर कोरोना संसर्ग टाळायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क लावण्याची सवय आणि वेळोवेळी हात धुण्याची सवय आपल्या लावावी लागेल. गुलेरिया यांनी असं वक्तव्य केलं की, "वृद्ध किंवा आधीपासून कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी बाहेर जाणं टाळलं पाहिजे. तसेच एयर क्वॉलिटीमुळे आरोग्याचे नुकसान होण्याचा धोका आहे. जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हा बाहेर जा आणि जेव्हा आपण बाहेर जाता तेव्हा मास्क लावायला विसरू नका." थंडीमध्ये प्रदूषण वाढतं त्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढला आहे.

तरुणांचे दुर्लक्ष वयोवृद्धावर संकट

डॉ. गुलेरियांच्या म्हणण्यानुसार असं दिसून आलं आहे की, कोरोना आमचं काही बिघडवू शकत नाही, आणि जरी त्यांना कोरोना झाला असेल तरीही, थोडीशी सर्दी किंवा ताप येईल आणि ते बरे होतील असा तरुणांचा समज झाला आहे. परंतु ते विसरत आहेत की ते ज्या घरात राहतात त्याच घरात वृद्ध लोकंही करतात आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे घरात कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यामुळे सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळणं महत्वाचं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 2, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या