मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

धक्कादायक ! कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना उद्भवतात मानसिक आजार

धक्कादायक ! कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना उद्भवतात मानसिक आजार

डॉक्टर सफेद कोट आणि ऑपरेशनवेळी हिरवे कपडे घालतात.

डॉक्टर सफेद कोट आणि ऑपरेशनवेळी हिरवे कपडे घालतात.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या काही मोजक्या रुग्णांमध्ये त्यांनी पूर्वी कधीही न अनुभवलेले मानसिक आरोग्याचे प्रश्न (Mental Health Problems) उद्भवल्याच्या काही केसेस आढळल्या आहेत.

न्ययॉर्क सिटी, 31 डिसेंबर: डॉ. हिसाम गुएली  त्यांच्या मानसोपचार रुग्णालयामध्ये (Mental Hospital) आलेल्या 42 वर्षांच्या पेशंट महिलेबद्दल सांगत होते. ती महिला स्वतः फिजिकल थेरपिस्ट होती आणि चार मुलांची आई होती. तिला किंवा तिच्या  कुटुंबीयांपैकी कोणालाही कधीही मानसिक आजार किंवा त्याची लक्षणंही नव्हती. न्यूयॉर्कमधल्या एमिटीव्हिलेमधल्या साउथ ओक्स हॉस्पिटलच्या एका खोलीत बसलेली ती महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती, 'माझी मुलं दोन ते 10 वर्षाची आहेत. माझ्या मुलांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार मारलं जात असताना मी पाहते आहे, असं मला सारखं वाटतं आहे. तसंच, मीच त्यांना मारण्याचा प्लॅन आखला आहे, असंही मला सारखं वाटतं आहे.' 'ती जणू काही 'किल बिल'सारख्या सिनेमाप्रमाणे अनुभव घेत होती,' असं डॉ. गुएली म्हणाले. 'एका मुलाच्या अंगावरून ट्रक गेला आहे आणि दुसऱ्या मुलाचा शिरच्छेद केला जात आहे, असं तिला वाटत होतं. एका चांगल्या शिकल्या-सवरलेल्या महिलेवर अशी वेळ यावी, हे भयानक आहे. 'मी तर माझ्या मुलांवर प्रेम करते; मग त्यांना मी मारत असल्यासारखं मला का वाटतं आहे,' असा सवाल ती विचारत होती,' असं डॉ. गुएली म्हणाले. तिच्या मेडिकल हिस्ट्रीमधली एकमेव गोष्ट दखल घेण्यासारखी होती, ती म्हणजे अलीकडचे सरलेल्या स्प्रिंगमध्ये तिला कोरोना व्हायरसचा संसर्ग (Coronavirus infection) झाला होता. तिला शारीरिक लक्षणं फारच अल्प दिसली होती; मात्र काही महिन्यांनंतर तिला एक आवाज ऐकू आला आणि त्याने आधी तिला स्वतःला मारायला सांगितलं. नंतर त्या आवाजाने तिच्या मुलांनाही मारण्याची आज्ञा दिली, अशी माहिती त्या महिलेने दिली. त्या महिलेने स्वतः इंटरव्ह्यू देण्यास नकार दिला; मात्र डॉ. गुएली यांनी तिच्या केसबद्दलची माहिती देण्यास काही हरकत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. साउथ ओक्स हॉस्पिटलमध्ये (South Oaks Hospital) कोविड-19 रुग्णांसाठी मानसिक उपचार करणारा विभाग आहे. या महिलेच्या मानसिक आजाराच्या लक्षणांमागे कोरोनाव्हायरस हेच कारण आहे, असं डॉ. गुएली यांना ठामपणे वाटत नव्हतं. ते कारण असू शकेल किंवा नसूही शकेल, असं त्यांना वाटत होतं; पण 'त्यानंतर एकामागून एक अशा चार केसेस आल्या आणि नंतर आम्हाला वाटलं, की यामागे नक्कीच काही तरी आहे,' असं डॉ. गुएली म्हणाले. संपूर्ण अमेरिकेत आणि जगभरातही अशा प्रकारच्या काही केसेस असल्याचं निरीक्षण डॉक्टर्सकडून नोंदवलं जात आहे. कोविडची लागण झालेल्या पेशंटपैकी काही मोजक्या पेशंटना काही आठवड्यांनंतर गंभीर मानसिक आजाराची लक्षणं (Severe mental symptoms) दिसू लागली आहेत. त्यांपैकी कोणालाही तशी समस्या त्याआधी नव्हती, हे विशेष. काही मुलाखती आणि वैज्ञानिक लेखांमध्ये डॉक्टर्सनी दिलेली माहिती अशी - नॉर्थ कॅरोलिनामधल्या नर्सिंग होममधल्या 36 वर्षांच्या एका महिला कर्मचाऱ्याला एकाएकी भीती वाटू लागली, की तिच्या तीन मुलांचं अपहरण होणार आहे. त्यांना वाचवण्यासाठी तिने फास्ट-फूड रेस्तराँच्या (Fast Food Restaurant) खिडकीतून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्कमधल्या 30 वर्षांच्या बांधकाम कामगाराला अचानक असा भास होऊ लागला, की त्याचा चुलतभाऊ त्याचा खून करणार आहे. स्वतःला वाचवण्यासाठी त्या कामगाराने आपल्या भावाचा तो झोपेत असताना गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ब्रिटनमधल्या 55 वर्षांच्या एका महिलेला माकडं आणि सिंहाचे भास व्हायला लागले. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना कुणी तरी या रूपात परिवर्तित केलं आहे, असं ती मानून चालू लागली. या प्रकारच्या व्यक्तिगत माहितीसोबतच, ब्रिटनमध्ये कोविडसाठी अॅडमिट केलेल्या 153 पेशंटचा अभ्यासही करण्यात आला. या 153 पेशंटमध्ये मेंदूच्या किंवा मानसिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी 10 जणांना सायकॉसिसची (Psychosis) सुरुवात नव्याने झाल्याचं अभ्यासात आढळलं. स्पेनमधल्या अशाच अभ्यासातही याच लक्षणांचे 10 जण आढळले. त्याशिवाय मिडवेस्ट, ग्रेट प्लेन्स आणि अन्य अनेक ठिकाणीही अशा प्रकारची लक्षणं असलेले पेशंट्स आढळत आहेत, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सोशल मीडिया ग्रुप्सवर (Social Media Groups) करत आहेत. डरहॅममधल्या ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधल्या डॉ. कोलिन स्मिथ यांना वाटतं, की कोविडची लागण ज्या ज्या प्रदेशात झाली आहे, तिथे हा प्रकार दिसत असणारच आहे. डॉ. कोलिन यांनी उल्लेख केलेल्या नॉर्थ कॅरोलिनामधल्या महिलेवरच्या उपचारांत मदत केली होती. डॉ. कोलिन आणि अन्य डॉक्टर्सनीही सांगितलं, की त्यांचे पेशंट्स या लेखाकरिता इंटरव्ह्यू घेण्याच्या बाबतीत अतिसंवेदनशील होते. वरील नॉर्थ कॅरोलिनामधील महिला आणि अन्य काही जणांनी मात्र संशोधनपर लेखांमध्ये त्यांच्या केसचा समावेश करण्याची परवानगी दिली. वैद्यकीय तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की अशा प्रकारचा तीव्र मानसिक आजार कोविडच्या रुग्णांमध्ये आढळण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असेल; मात्र कोविड-19 रोगामुळे मानसिक आरोग्य आणि मेंदूच्या कार्यावर कमा परिणाम होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणून त्यांचा अभ्यास केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे श्वसनयंत्रणेवर दुष्परिणाम (Effect of Coronavirus on respiratory System) होतो, असं सुरुवातीला वाटलं होतं; मात्र आता इतर अनेक लक्षणांचेही अनेक पुरावे आहेत. त्यात मेंदूवरच्या, आकलनविषयक आणि मानसिक परिणामांचा समावेश आहे. ज्या कोविड पेशंटमध्ये फुप्फुसं, हृदय किंवा अभिसरणात मोठ्या समस्या निर्माण झाल्या नव्हत्या, अशा पेशंटमध्येही या नव्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. तसंच, त्या किती काळपर्यंत राहतील किंवा त्यावर उपचार नेमके कसे करायचे, याबद्दल मात्र पुरेशी स्पष्टता आलेली नाही. मेंदूवर होणारे परिणाम म्हणजे कोरोना व्हायरसला शरीराच्या प्रतिकारयंत्रणेने  (Immune System) दिलेला प्रतिसाद असू शकतो, या निष्कर्षाप्रत तज्ज्ञ येऊ लागले आहेत. तसंच, मेंदू वगळता अन्य शरीरांतर्गत निर्माण होणाऱ्या समस्या किंवा दाह हा रोगाच्या प्रक्रियेचा (Disease Process) भाग असावा, असं तज्ज्ञांना वाटतं. 'शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून कार्यान्वित झालेली काही न्यूरोटॉक्सिन्स मेंदूपर्यंत पोहोचू शकतात आणि अशा प्रकारची हानी घडवू शकतात,' असं डॉ.  विल्मा गॅबे (सह-संचालक, न्यूयॉर्कमधील सायकिअॅट्री रिसर्च इन्स्टिट्यूट) यांनी सांगितलं. गॅबे यांच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या कोविडनंतर उद्भवलेल्या सायकॉसिसच्या दोन पेशंटवर उपचार करण्यात आले. त्यांचे ब्रेन स्कॅन आणि स्पायनल फ्लुइडचं (मज्जाद्रव्य) विश्लेषण, तसंच अन्य काही चाचण्यांमध्येही मेंदूत काही संसर्ग असल्याचं आढळलं नाही, असं गॅबे यांनी नमूद केलं. त्यांच्या एका 49 वर्षीय पुरुष पेशंटला वेगवेगळे आवाज ऐकू येत होते आणि तो स्वतः सैतान आहे, असा भास त्याला होऊ लागला होता. 34 वर्षांची महिला पेशंट स्वतःसोबत सुरी बाळगू लागली होती. तसंच अनोळखी व्यक्तींसमोर कपडे काढायची आणि आपल्या अन्नपदार्थांमध्ये हँड सॅनिटायझर घालायची. कोविड-19 या पेशंटमध्ये शारीरिकदृष्ट्या मोठी लक्षणं दिसत नव्हती. डॉ. गुएली यांनी उपचार केलेल्या रुग्णांमध्ये श्वसनाची समस्या कोणालाच नव्हती. पण व्हर्टिगो, हाताला मुंग्या येणं, डोकेदुखी, वास कमी येणं अशा मेंदूशी निगडित समस्या अनेकांना होत्या. त्यानंतर दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळानंतर त्यांना सायकॉसिसची तीव्र लक्षणं दिसू लागली आणि ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी खूपच भीतिदायक होतं, असं डॉ. गुएली म्हणाले. यापैकी बहुतांश पेशंट्स हे तिशी, चाळिशी किंवा पन्नाशीतले आहेत, ही एक दखल घेण्यासारखी गोष्ट. या वयातल्या व्यक्तींना असा सायकॉसिस होणं, ही दुर्मीळ गोष्ट असल्याचं डॉ. गुएली म्हणाले. कारण अशी लक्षणं तरुणांमध्ये स्क्रिझोफ्रेनियासोबत (Schizophrenia) दिसतात किंवा वृद्धांमध्ये डिमेन्शियासोबत (Dementia) दिसतात. सायकॉसिस असलेल्या व्यक्तींना आपण सत्य जगापासून दूर आलो आहोत याची जाणीव नसते; पण वर उल्लेख केलेल्या फिजिकल थेरपिस्ट महिलेच्या केसमध्ये तिला जाणवत होतं, की काही तरी चुकीचं घडतं आहे. कोविडनंतर ज्यांना सायकॉसिस झाला आहे, अशा पेशंटना अनेक आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागले. डॉक्टर्सनी त्यांच्यावर अनेक उपचारांचे प्रयोग केले. बाल्टिमोरमधल्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूलमधले न्यूरोव्हायरॉलॉजी तज्ज्ञ डॉ. रॉबर्ट योकेन यांनी सांगितलं, की कोविड19मधून पेशंट शारीरिकदृष्ट्या बरा होऊ शकतो; पण काही केसेसमध्ये विषाणूचे थोडेसे अंश दीर्घकाळ शरीरात राहिल्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकार यंत्रणा काम करणं थांबवत नाहीत किंवा त्याच कामात अडकून पडू शकतात. अशा प्रकारे रोगप्रतिकार यंत्रणा सातत्याने कार्यरत राहिली तर मेंदूच्या आणि स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि कोविड पेशंट्समध्ये तेच होत असावं, असा अंदाज जॉन हॉपकिन्सच्या स्क्रिझोफ्रेनिया तज्ज्ञांनी वर्तवला. ही प्रतिकार यंत्रणा मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम करते यावरून काही जणांना मज्जासंस्थेशी निगडित लक्षणं दिसतात, काही जणांना मानसिक लक्षणं दिसतात, तर काही जणांना दोन्ही प्रकारची लक्षणं दिसतात, अशी शक्यता योकेन यांनी वर्तवली. काही जणांमध्ये पूर्वी न आढळलेली मानसिक रोगाची स्थिती किंवा जनुकीय संरचना यांमुळे काही विशिष्ट लोकांना याचा धोका जास्त आहे का, याबद्दल तज्ज्ञांना माहिती नाही. ड्यूक येथील सायकिअॅट्रिक इमर्जन्सी डिपार्टमेंट सर्व्हिसेसचे मेडिकल डायरेक्टर डॉ. ब्रायन किन्कैड यांनी सांगितलं, की वर उल्लेखलेल्या नॉर्थ कॅरोलिनामधल्या महिलेल्या पूर्वी एका विषाणूच्या संसर्गामुळे त्वचेवर रिअॅक्शन आली होती. तिच्या शरीरातली रोगप्रतिकार यंत्रणा (Immune System) विषाणूच्या संसर्गाला अशा प्रकारे प्रतिसाद देत असावी, असं म्हणायला वाव आहे. यापूर्वी 1918मधला फ्लू, तसंच सार्स आणि मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम या विषाणूजन्य रोगांच्या साथींनंतरही सायकॉसिसच्या समस्या उद्भवल्या होत्या. अल्बर्ट आइन्स्टाइन कॉलेज ऑफ मेडिसिनमधले मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जोनाथन अल्पर्ट यांनी सांगितलं, की सायकॉसिसचा हा प्रकार कोविडपुरता मर्यादित नाही. या केस अभ्यासल्या तर सायकॉसिसबद्दलचं डॉक्टर्सचं ज्ञान वाढू शकेल. ही लक्षणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही वेळा तर पहिल्या वेळी ती तीव्र असतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. डॉ. गुएली यांनी सांगितलं, की 46 वर्षांच्या फार्मसी टेक्निशियन असलेल्या एका पेशंटला तिच्या कुटुंबीयांनी आणलं, तेव्हा ती पहिले चार दिवस रडत होती. कारण काही शक्तींनी तिचं घर उद्ध्वस्त केल्याची भीती तिला वाटत होती. 30 वर्षांच्या बांधकाम कामगार पेशंटला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा तो खूप हिंसक झाला होता. त्याने हॉस्पिटलचा रेडिएटर तोडून त्याच्या साह्याने खिडक्या फोडायचा प्रयत्न केला. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यावर खुर्ची फेकायचाही प्रयत्न केला होता. सायकॉसिस किती काळ राहिला आणि उपचारांना पेशंटनी कसा प्रतिसाद दिला, यातही फरक आहे. ब्रिटनमधल्या महिलेला लाल रंगाची भीती वाटत होती. तिला बरं व्हायला 40 दिवस लागले. माँटेफिओरे येथील 49 वर्षांच्या पेशंटला अनेक आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं; मात्र आता दोन महिने बाहेर असूनही त्याचा संघर्ष सुरूच आहे. त्याला पुन्हा अॅडमिट करण्याची गरज असल्याचं गॅबे यांनी सांगितलं. नॉर्थ कॅरोलिनामधल्या महिलेला तिच्यावर सेलफोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याची भीती वाटत होती. पहिल्या वेळच्या उपचारांनी तिला बरं वाटलं नाही, असं ड्यूकमधले डॉ. जोनाथन कोमिसर यांनी सांगितलं. तिच्यावर अँटीसायकॉटिक उपचार केल्यानंतर तिला एका आठवड्यात बरं वाटलं. आपणच आपल्या मुलांना मारण्याचा कट रचला आहे, असं ज्या फिजिकल थेरपिस्टला वाटत होतं, तिला बरं होण्यात अनेक अडचणी आल्या. दर दिवशी तिची तब्येत ढासळत होती, असं डॉ. गुएली यांनी सांगितलं. तिच्यावर अँटिडिप्रेसंट, अँटिसायकॉटिक्स, लिथियम अशा आठ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे उपचार करण्यात आले. शेवटी इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (Electroconvulsive Therapy ) करण्याच्या विचारात आम्ही होतो. दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर तिला तिचं दोन वर्षांचं मूल कसं दिसतं, हे आठवेनासं झालं. तिच्या घरून येणाऱ्या कॉल्समुळे ती आणखीच अस्वस्थ होऊ लागली. शेवटी रिस्परीडोन प्रभावी ठरलं आणि चार आठवड्यांनंतर ती घरी जाऊ शकली. तेव्हा ती 95 टक्के बरी झाली होती, असं डॉ. गुएली यांनी सांगितलं. याचं नैसर्गिक कारण, प्रक्रिया आपल्याला माहिती नाही. हे आपोआप निघून जाईल का, लोक चांगले बरे होतील का, त्यासाठी किती दिवस लागतील, तुम्हाला मानसिक समस्या येण्याची शक्यता किती आहे, असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत, असं डॉ. गुएली यांनी सांगितलं. - पाम बेलुक, दी न्यू यॉर्क टाइम्स कंपनी ही बातमी भीतिदायक स्थितीचं वर्णन करणारी आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला अशा प्रकारच्या समस्येत मदत हवी असेल, तर खालील हेल्पलाइन्सवर संपर्क साधू शकता. Aasra (Mumbai) 022-27546669, Sneha (Chennai) 044-24640050, Sumaitri (Delhi) 011-23389090, Cooj (Goa) 0832- 2252525, Jeevan (Jamshedpur) 065-76453841, Pratheeksha (Kochi) 048-42448830, Maithri (Kochi) 0484-2540530, Roshni (Hyderabad) 040-6622000, Lifeline 033-64643267 (Kolkata)
First published:

Tags: Corona vaccine, Health

पुढील बातम्या