लखनऊ 26 एप्रिल : कोरोना (Coronavirus) काळात अगदी सख्खी नातीही दुरावताना दिसत आहेत. अनेकजण स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका मुलानं स्वतःच्या आजारी आईला कोरोनाच्या भीतीनं घराबाहेर काढलं आहे. यानंतर जमीनीवरच झोपलेल्या या वृद्ध महिलेचा रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) झाला. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यानच या महिलेचा मृत्यू झाला.
हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कैंट ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. असा आरोप आहे, की एका व्यक्तीच्या आईची प्रकृती अचानक खराब झाली. यानंतर या आरोपी मुलानं आईवर उपचार कऱण्याऐवजी आपल्या बहिणीच्या घराबाहेर रस्त्यावर तिला सोडलं. आई आजारी असल्याचं समजल्यानं मुलीनं आणि जावयानंही तिला घरात घेण्यास नकार दिला. यादरम्यान जीवन मरणाची लढाई लढत असलेल्या या महिलेचा कोणीतरी व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला.
पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करुनही महिलेचा जीव वाचला नाही. तपासात समोर आलं, की ही महिला कोरोनाबाधित (Corona Positive) होती. घरातल्या एकाही सदस्यानं या परिस्थितीमध्ये त्यांची मदत केली नाही आणि त्यांना घराबाहेर काढलं. पोलिसांनी सांगितलं, की सोशल मीडियावर वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत होता. यामध्ये महिला चादर घेऊन रस्त्यावर झोपलेली दिसत होती. यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तपासादरम्यान समोर आलं, की या महिलेला तिच्या मुलानंच रस्त्यावर सोडलं होतं. याप्रकरणी मुलाविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देश चिंतेत आहे. रोज हजारो लोकांचे जीव जात आहेत. अशा परिस्थितीत आपलेच आपल्या लोकांची साथ सोडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातही मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेडचादेखील मोठा तुटवडा जाणवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus, Video viral