Home /News /coronavirus-latest-news /

9 तासाच्या विमान प्रवासादरम्यान 52 जणांना कोरोनाची लागण! दिल्लीहून निघाले तेव्हा निगेटिव्ह होते सर्वांचे रिपोर्ट

9 तासाच्या विमान प्रवासादरम्यान 52 जणांना कोरोनाची लागण! दिल्लीहून निघाले तेव्हा निगेटिव्ह होते सर्वांचे रिपोर्ट

नियमानुसार प्रवासाआधी सर्व प्रवाशांची चाचणी करूनही विमानातील 52 प्रवाशांना कोरोनाची लागण (52 Passengers Tests Positive for Covid 19) झाल्याने खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली 27 एप्रिल : जगभरात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लावले आहे. लोकांना अत्यावश्यक सेवांशिवाय बाहेर पडू नका असं आवाहन शासनाकडून केलं जात आहे. नव्या नियमावलींमुळे प्रवासावरही बरेच निर्बंध आले आहेत. प्रवास करण्यापूर्वी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण दिल्लीतून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. नियमानुसार सर्व प्रवाशांची चाचणी करूनही विमानातील 52 प्रवाशांना कोरोनाची लागण (52 Passengers Tests Positive for Covid 19) झाल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली विमानतळाहून 118 प्रवासी घेऊन विस्तारा एअरलाईन्सच्या (Vistara Airline) विमानाने हाँगकाँगच्या (Hong Kong) दिशेनं उड्डाण केलं. तेव्हा या सर्व प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. मात्र, प्रवासाच्या 9 तासांत यापैकी 52 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असं हाँगकाँगमध्ये झालेल्या कोरोना चाचणीतून लक्षात आलं आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उडाली खळबळ - 4 एप्रिलला 118 प्रवाशी दिल्ली विमानतळावरून हाँगकाँगला रवाना झाले. प्रवासापूर्वी सर्व प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट तपासले गेले होते. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. त्यामुळेच त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वजण 9 तासांनी हाँगकाँगला पोहोचले. तिथं दुसऱ्यांदा सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यावेळी 52 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. प्रवाशांना केलं क्वारंटाईन - भारतातून हाँगकाँगला पोहोचेपर्यंत 9 तासांत 52 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे विमानात हे प्रवासी कसे पॉझिटिव्ह झालेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबतीत हाँगकाँग अथॉरिटीने म्हटलंय की, कोरोना संसर्गाची माहिती 72 तासांनी होते. त्यामुळे हे प्रवासी एअरपोर्टवर बाधित झाले असतील किंवा त्यांच्या रिपोर्टमध्ये चूक असेल, अशी शक्यता हाँगकाँगमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून आता या सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (corona second wave) भयानक रुप धारण केलंय. गेल्या आठवड्यापासून दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहे, तर दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद केली गेली आहे. या लाटेतील विषाणू म्युटेंट झाल्याने संक्रमण वेगाने वाढत आहे. त्यामुळे मालदीव, कॅनडा, ओमान, सौदी अरेबिया, कुवेत, सिंगापूर, इंडोनेशिया, आणि युकेसह अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तसंच ज्या देशांनी प्रवाशांना परवानगी दिली आहे, त्याठिकाणी त्यांना 14 दिवस क्वारंटाइन केलं जात आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona patient, Coronavirus

पुढील बातम्या