नवी दिल्ली, 21 जुलै : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशात आता लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. दिल्लीत एक दोन नव्हे तर तब्बल 47 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं नाहीत. सिरो सर्व्हेमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत हा सिरो सर्व्हे करण्यात आला. दिल्लीतील 11 जिल्ह्यांतून 27 जून ते 10 जुलै पर्यंत 21,387 नमुने घेण्यात आले. 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज मिळाल्यात. सर्वेक्षणानुसार दिल्लीत गेल्या 6 महिन्यात 23.48 टक्क्यांपेक्षा जास्त लोक कोरोनाने प्रभावित झाले. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत.
रिपोर्टनुसार दिल्लीची लोकसंख्या 2 कोटी असेल तर जवळपास 47 लाख लोकांना व्हायरसची लागण झालेली असू शकते. यापैकी बहुतेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत.
मुंबईतील परिस्थितीही चिंताजनक
दिल्लीप्रमाणे मुंबईकरांमध्येदेखील कोरोनाविरोधात अँटिबॉडीज मिळाल्यात. या लोकांना आपल्याला कोरोना झाला होता याची माहितीच नाही. एका खासगी प्रयोगशाळेने अँटिबॉडी टेस्ट केली. त्यामध्ये काही लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचं दिसलं. याचा अर्थ या लोकांना कोरोनाची लागण झाली होती.
लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली
कोरोनाव्हायरस हा शिंकताना, खोकताना तोंडातून निघाणाऱ्या थेंबावाटे पसरतो. या थेंबाच्या संपर्कात आल्यास कोरोनाची लागण होते, असं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो.
हे वाचा - मुंबईतून आली चिंताजनक माहिती; आपल्याला कोरोना झाला हे 36% लोकांना माहितीच नाही
बोलताना आणि श्वासामार्फतदेखील हा व्हायरस पसरू शकतो आणि त्याचं संक्रमण होऊ शकतं, कारण हा व्हायरस हवेत बराच काळ राहतो असं संशोधकांनी म्हटलं. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हवेतून कोरोना पसरू शकतो ही शक्यता नाकारली नाही. काही ठिकाणी हवेतून कोरोना पसरण्याचा धोका आहे, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, असे रुग्णदेखील कोरोना पसरण्यास कारणीभूत ठरू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus