114 वर्षीय व्यक्तीने कोरोनाला हरवलं; भारतात परवानगी मिळालेल्या त्या औषधाची कमाल

114 वर्षीय व्यक्तीने कोरोनाला हरवलं; भारतात परवानगी मिळालेल्या त्या औषधाची कमाल

भारतात कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी ज्या औषधाला नुकतीच मान्यता देण्यात आली, त्याच औषधाने या रुग्णावर उपचार झाले.

  • Share this:

अदिस अबाबा, 28 जून :  इथिओपियातील (Ethiopia) 114 वर्षीय व्यक्तीने कोरोनाव्हायरशी यशस्वी लढा दिला आहे. विशेष म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी ज्या औषधाला नुकतीच मान्यता देण्यात आली, त्याच औषधाने ही कमाल केली आहे. डेक्सामेथासोन (Dexamethasone) या औषधाने या रुग्णावर उपचार करण्यात आले.

तिलाहुन वुल्डेमाइकल (Tilahun Woldemichael) असं या व्यक्तीचं नाव आहे. ते बौद्ध भिक्षु (Monk) आहेत. त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. शिवाय डेक्सामेथासोन हे औषध दिलं गेलं.

इथिओपियाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, जे कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर आहेत अशा गंभीर रुग्णांना डेक्सामेथासोन औषध देण्यास सांगण्यात आलं आहे.

हे वाचा - कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर

तिलाहुन यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे. तिलाहुन यांचे नातू बिनियम लियुसेगेड यांनी सांगितलं, आजोबा जेव्हा रुग्णालयात गेले तेव्हा खूप चिंता वाटली होती. मात्र आता ते रुग्णालयातून निरोगी होऊन पुन्हा घरी परतलेत याचा आनंद वाटतो आहे.

दरम्यान आजोबांच्या वयाबाबत सांगताना 'आपल्याकडे आजोबांच्या वयाचा कोणता दाखला नाही मात्र त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाचा फोटो आहे. ज्या फोटोत शंभराव्या वयातही ते अगदी तरुण वाटत आहेत', असंही बिनियम यांनी सांगितलं.

काय आहे डेक्सामेथासोन औषध?

डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे सर्वत्र उपलब्ध होणारं स्वस्त असं औषध आहे.

हे वाचा - अमेरिकेत ही कंपनी करतेय कोरोनावरच्या औषधाची अंतिम चाचणी, 4 महिन्यांत लस बाजारात

ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे असा सल्लाही WHO ने दिला होता.

भारतातही कोरोनावर उपचारासाठी डेक्सामेथासोन औषधाला परवानगी

कोरोनाव्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन (Dexamethasone) औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 28, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading