मुंबई, 28 जानेवारी: कोरोना महामारी (Corona Pandemic) मधून अजूनही जग संपूर्ण बाहेर आलेलं नाही. वर्षभरापूर्वी या महामारीनं जगभर हातपाय पसरवण्यास सुरुवात केली होती. या जीवघेण्या आजारातील जगभरातील पेशंट्सची संख्या ही आता 10 कोटी झाली आहे. या आजारापासून संरक्षण व्हावं यासाठी अनेक देशांमध्ये कोरोना व्हॅक्सिन (Covid-19 Vaccine News) दिले जात आहे. त्याचवेळी ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरसमुळे (New Coronavirus Strain) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.
कोणत्या देशात सर्वात जास्त केस?
कोरोना व्हायरसच्या सर्वात जास्त केस अमेरिकेत (U.S.) आहेत. तर दुसऱ्या नंबरवर भारत आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूची देखील सर्वात जास्त संख्या अमेरिकेत आहे. या यादीमध्ये ब्राझील (Brazil) दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
(हे वाचा-हद्दच झाली! कोरोना नाही हे सिद्ध करण्यासाठी चाटलं ATM मशीन; शेअर केला LIVE VIDEO)
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधनानुसार अमेरिकेत कोरोनाच्या एकूण 2.5 कोटी केसेस आहेत. यामध्ये 4.20 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकेतील कोरोना लवकर संपणार नाही, असा इशारा अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी दिला आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी अमेरिकन प्रशासनानं संपूर्ण शक्ती पणाला लावली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय बायडेन प्रशासनानं घेतला आहे.
ब्रिटनमध्ये 1 लाख मृत्यू
ब्रिटनमध्ये (Britain) या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ही 1 लाख झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ही माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन सापडला होता. त्यानंतर ब्रिटनमधील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आलं आहे.
(हे वाचा-वारंवार वापरत असलेला MASK बदलण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्यासाठी सोपी ट्रिक)
देशातील कोरोनाची स्थिती गंभीर असल्यानं पंतप्रधान जॉन्सन यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये येणं टाळलं होतं. ब्रिटनमधील नवा कोरोना स्ट्रेन हा यापूर्वीच्या व्हायरसपेक्षा 30 टक्के जास्त खतरनाक आहे, अशी माहिती आहे.