मुंबई, 25 जानेवारी: खाद्यपदार्थ विक्री आणि घरपोच डिलिव्हरी या क्षेत्रात कोरोना महामारीच्या काळात मोठी वाढ झाली. त्याचमुळे खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक छोटे व्यवसाय उभे राहिले, तसंच झोमॅटो, स्विगी यांसारख्या घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही वेगानं विस्तारल्या. आयटीसारख्या क्षेत्रामध्ये नोकरकपातीचं वारं वाहत असताना झोमॅटोनं मात्र मोठी नोकरभरती घोषित केलीय. इंजिनीअर, प्रॉडक्ट मॅनेजर, जनरलिस्ट यांसारख्या 5 पदांसाठी तब्बल 800 उमेदवार त्यांना हवे आहेत. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी लिंक्ड इन पोस्टच्या माध्यमातून हे जाहीर केलंय. 'इंडिया डॉट कॉम'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
तुमच्या जॉब अप्लिकेशनसोबत Cover Letter नसेल तर नोकरी मिळत नाही? एक्सपर्ट्सनी दिलं परफेक्ट उत्तर
ग्रोथ मॅनेजर पदासाठी काम करताना उमेदवाराकडून खाद्यपदार्थांच्या घरपोच विक्रीचं जाळं मजबूत करण्याची अपेक्षा असल्याचं जाहिरातीत म्हटलंय. तसंच कामाच्या जबाबदारीबाबतही माहिती दिली आहे. उमेदवारानं ग्राहक, डिलिव्हरी पार्टनर्स, रेस्टॉरंट पार्टनर्स, कर्मचारी यांना योग्य सेवा देणं गरजेचं आहे. ग्राहक व व्यवसायातल्या इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, एखादं रेस्टॉरंट चालवणं म्हणजे काय असतं, याची कल्पना असणं, समस्या जाणून घेऊन त्यावर वेळीच उपाय शोधणं असा गोष्टींची अपेक्षा उमेदवाराकडून असेल. हा व्यवसाय म्हणजे सेवा व्यवसाय असल्यानं ग्राहकांच्या मागणीवरच सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे मोठे सण, उत्सव, सुट्ट्या या कालावधीसाठी स्वतःला तयार ठेवणं गरजेचं असल्याचं यात म्हटलं आहे.
उमेदवारांना झोमॅटोमध्ये चीफ ऑफ स्टाफ ते सीईओ पदापर्यंत नोकरीची संधी मिळू शकते. ब्लिंकिट, हायपरप्युअर आणि झोमॅटोमध्ये ही महत्त्वाची पदं मिळू शकतात. एकंदरीतच झोमॅटोमध्ये येऊन उमेदवार त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळवू शकतात, असं कंपनीनं म्हटलंय.
दरम्यान, झोमॅटोची स्पर्धक कंपनी स्विगी सध्या नोकरकपातीच्या तयारीत असल्याचं समजतंय. जागतिक मंदीच्या भीतीनं स्विगी 10 टक्के नोकरकपात करू शकते. यामुळे कंपनीचंच्या उत्पादन, इंजिनीअरिंग आणि ऑपरेशन या विभागांवर परिणाम होण्याची शक्यता असून स्विगीच्या इन्स्टामार्ट सिस्टीमला त्याची झळ बसू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Zomato