मुंबई, 24 मार्च : गेल्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसंच, अचानक उष्मा वाढू लागला. या वर्षी उष्णतेची लाट होरपळून टाकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर उष्ण वाऱ्यांमुळे प्राणी आणि जंगलावरही वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. आयएमडीसोबतच जागतिक बँकेनेही उष्णतेबाबत गंभीर इशारा दिला आहे.
जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, तापमानात सातत्याने होणारी वाढ केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील अनेक वर्षं सामान्य जनजीवनावर प्रतिकूल परिणाम करील. त्यामुळे मानवी जीवनावर अनेक प्रकारे संकटाचे ढग दाटून राहतील. वाढतं तापमान आणि हवामानातले बदल यामुळे मानवी जीवनाला दुहेरी धोका निर्माण होईल, असं जागतिक बँकेच्या क्लायमेट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी इन इंडियाज कूलिंग सेक्टर या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
हवामान कसं वेगानं बदलतंय
या वर्षी देशात उष्णतेची तीव्र लाट येईल, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी मार्च 2022मध्ये दिला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला आणि उष्णतेनं देशभरातले नागरिक होरपळून निघाले. फेब्रुवारी 2023मध्येही अचानक हवामान बदलले आणि हलक्या थंड हवामानात जून-जुलैचा फील येऊ लागला. गेल्या 17 वर्षांत या वर्षी फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण होता, असं हवामान खात्याने सांगितलं. यंदाही उष्णतेच्या लाटेचा सामान्य जनजीवनावर वाईट परिणाम होईल, असा अंदाज आता हवामान खात्याने पुन्हा वर्तवला आहे.
नोकरी जाण्याचा आणि हवामानाचा कसा आहे संबंध?
जागतिक बँकेने आपल्या अहवालात एका बाजूला असं म्हटलं आहे, की यावर्षी उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे, तर दुसरीकडे उष्ण वारे वाहिल्याने उत्पादकतेवरही परिणाम होणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. उत्पादकता घटल्याने रोजगारावर परिणाम होईल. यासोबत अहवालात असंही म्हटलं आहे, की सतत वाढणाऱ्या उन्हाळ्याच्या कालावधीमुळे जगभरातले 80 दशलक्ष नागरिक येत्या सात वर्षांत म्हणजेच 2030पर्यंत आपल्या नोकऱ्या गमावू शकतात. भयावह अंदाज असा आहे, की खराब हवामानामुळे एकट्या भारतात यापैकी तीन कोटी नोकऱ्या जातील.
पाणी, वन, जमीन आणि जीवनावर होईल परिणाम
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाही देशभरात उष्णतेची लाट येणार आहे. एवढंच नाही, तर वर्षानुवर्षं हा प्रकार वाढत जाणार आहे. सतत वाढणाऱ्या उष्णतेचा सर्वांच्या जीवनावर थेट परिणाम होणार हे नक्की. कडक उन्हाचा पाणी, जंगल, जमीन आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होईल. यंदा फेब्रुवारीत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. फेब्रुवारी 2023मधले सहा दिवस कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच मे-जूनमधला उन्हाळा अनुभवायला मिळाला.
कडक उन्हाचा सामना करण्यासाठी काय करावं?
गेल्या काही वर्षांपासून सतत वाढत असलेला उष्मा आणि येत्या काही वर्षांसाठी वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार आता नागरिकांनी वाढत्या उष्म्याला तोंड देण्यासाठी तयारी करायला हवी. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या वेळी एप्रिल-मे मध्येच जून आणि जुलैप्रमाणे उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे, की यंदाच्या फेब्रुवारीतच एवढी उष्णता का होती? यावर हवामान खात्याने सांगितलं, की या वेळी वेस्टर्न डिस्टर्बन्स नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच प्रचंड उष्णता जाणवत होती. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडतो आणि वातावरण आल्हाददायक राहतं. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मान्सून नसतानाही पाऊस पडतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.