नवी दिल्ली, 11 जून : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा (IES) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2020 चे मुलाखत वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. IES आणि ISS 2020 परीक्षांचे मुलाखत वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जारी केले गेले आहे. 19 जुलै ते 22 जुलै 2021 या कालावधीत यूपीएससीकडून आयईएस आणि आयएसएस पदांसाठीच्या मुलाखती दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहेत. अगोदर यूपीएससीकडून आयईएस आणि आयएसएसची पदांसाठीची मुलाखत 19 ते 23 एप्रिल 2021 दरम्यान होणार होती. मात्र, त्यावेळी देशभरात सर्वत्र कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सध्या देशात कोरोना रुग्णसंख्या काहीसी नियंत्रणात आहे.
सध्या कोरोना परिस्थिती आणि इतर गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आयोगाकडून 19 जुलै 2021 पासून भारतीय आर्थिक सेवा परीक्षा, 2020 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 यांची मुलाखत चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आयोगाकडून जारी परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
यूपीएससीकडून आयइएस आणि आयएसएस मुलाखत वेळापत्रकामध्ये शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी देण्यात आली आहे. यामध्ये मुलाखतीची तारीख आणि वेळ, रोल नंबर आणि कोणत्या सत्रात आहे त्याचा उल्लेख आहे. आयईएस आयएसएस पदांसाठीच्या नियोजित मुलाखती संपल्यानंतर यूपीएससीद्वारे अंतिम निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांना सर्व वैध कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा पद्धत -
UPSC कडून होणाऱ्या आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भरती प्रक्रियेच्या टप्प्यांना हजेरी लावावी लागते. परीक्षार्थींना प्रत्येक टप्प्यात पात्र ठरण्यासाठी श्रेणीनुसार आयईएस आयएसएस कट-ऑफपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणे अनिवार्य असते. यूपीएससीकडून आयईएस आयएसएस मुलाखतीसाठी एकूण 162 उमेदवार पात्र ठरवण्यात आले आहेत. 162 पैकी 131 उमेदवारांना भारतीय सांख्यिकी सेवेसाठी आणि 31 उमेदवारांना भारतीय आर्थिक सेवेसाठी बोलावण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.