गुजरात, 25 मे : जुळ्या भावंडांच्या सगळ्या गोष्टी सारख्या असतात. अनेकांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होतं. त्यांचं दिसणं, बोलणं, वागणंही बरेचदा सारखं असतं, यात काहीच नवल नाही; मात्र सुरतमधल्या जुळ्या भावंडांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणही अगदी एकसारखेच मिळवले आहेत.
दहावीचा गुजरात बोर्डाचा निकाल आज (25 मे 2023) लागला. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सुरतमध्ये उत्तीर्ण मुलांची टक्केवारी सर्वाधिक आहे. सुरत जिल्ह्यातल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 76.45 टक्के आहे, तर दाहोद जिल्ह्यात सर्वांत कमी 40.75 टक्के निकाल लागला आहे. गुजरातच्या दहावीच्या या निकालामध्ये सुरतच्या जुळ्या भावंडांनी मिळवलेले समान गुण हीदेखील सध्या चर्चेची गोष्ट ठरते आहे.
रुद्र आणि ऋत्व अशी या जुळ्या भावंडांची नावं आहेत. रुद्रला 600 पैकी 570 म्हणजे 95.50 टक्के गुण मिळाले आहेत. ऋत्वलाही 600 पैकी 570 गुणच मिळाले आहेत.
(Success Story: 12 वीमध्ये नापास अन् जिद्दीच्या जोरावर झाले IPS, फक्त स्वत:वर विश्वास ठेवा!)
सुरत शहराबाहेर असलेल्या भक्ती इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या या दोघांनी त्यांच्या कुटुंबासह शाळेचं नाव उंचावलं आहे. त्यांचं कुटुंब शहरात कापड व्यवसाय करतं. त्यांच्या निकालाने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या गुणांवरही प्रभाव दिसून आलाय.
ही दोघंही भावंडं एकाच वर्गात शिकत होती. वर्षभर त्यांनी एकत्रपणे अभ्यास केला होता. त्यांना गुणही सारखेच मिळाले आहेत. यात विशेष गोष्ट अशी की, दोघांनीही वर्षभर त्यांच्या फोनला हातही लावला नाही. संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. आता त्यांना कॉम्प्युटर सायन्स या विषयात करिअर करायचं आहे.
एकसारखे गुण मिळवणारी ही भावंडं एकसारखीच दिसतात, एकसारखे कपडे घालतात. त्यांचा हा सारखेपणा त्यांच्या परीक्षेतल्या गुणांमध्येही प्रतिबिंबित झाला आहे. या सारखेपणामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे; मात्र त्यामागे त्यांची मेहनत कारणीभूत आहे.
(Success Story: 12 वीमध्ये नापास अन् जिद्दीच्या जोरावर झाले IPS, फक्त स्वत:वर विश्वास ठेवा!)
रुद्र आणि ऋत्व यांच्या निकालामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाला आहे. ते वर्गामध्ये एकाच बाकावर बसून अभ्यास करायचे. अभ्यासात एकमेकांना मदत करायचे. आता त्यांनी परीक्षेत एकसारखे व चांगले गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या शाळेतही याची खूप चर्चा होत आहे. जुळी भावंडं असूनही काही व्यक्ती परस्परविरोधी असतात; मात्र सुरतमधल्या या भावंडांचे तर दहावीचे गुणही जुळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18