नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE नं बारावीचा निकाल (CBSE 12th Exam 2021) 30 जुलै रोजी जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला, तर काही विद्यार्थी मात्र अत्यंत असमाधानी आहेत.. काहींनी आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला तर काही विद्यार्थी त्यांच्या पालकांसह शाळेत पोहोचले. म्हणूनच वर्ल्डग्रेडनं (World grade) अशा विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण (Survey) केलं आहे. या सर्वेक्षणातून अंत्यंत धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
सर्वेक्षण अहवालानुसार, केवळ 53% विद्यार्थी सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेच्या निकालावर समाधानी आहेत. तर एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निकालावर असमाधान व्यक्त केलं आहे आणि ऑफलाइन लेखी परीक्षेला (CBSE offline exam date) बसण्याची इच्छा आहे.
CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोविड -19 महामारीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या बोर्डाचा निकाल विशेष मूल्यमापन धोरणाच्या आधारे जाहीर करण्यात आला होता. यामध्ये 10 वी, 11 वी आणि 12 वी चे अंतर्गत गुण समाविष्ट करण्यात आले होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची परत परीक्षा देण्याची तयारी आहे.
हे वाचा - प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET
काय सांगतो अहवाल
एकूण 16000 विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात भाग घेतला होता. सर्वेक्षणादरम्यान बारावीच्या 24 टक्के विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या निकालाला 1 किंवा 2 रेटिंग दिलं आहे. याचा अर्थ ते निकालाबद्दल अत्यंत असमाधानी आहेत. बारावीच्या एक तृतीयांश विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. तसंच 70 टक्के विद्यार्थी निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे असमाधानी आहेत, कारण यामुळे त्यांच्या परदेशी विद्यापीठांमध्ये अर्ज करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की, चांगल्या विद्यार्थ्यांनाही CBSE नं सरासरी विद्यार्थ्यांच्या पातळीवर आणलं आहे. काही प्राविण्य श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकलही इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी लागले आहेत. त्यामुळे असे विद्यार्थी परीक्षा देण्यास उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, CBSE, Students