Home /News /career /

या क्षेत्रात चलती! नोकरी बदलली तर होणार सर्वाधिक 'फायदा'

या क्षेत्रात चलती! नोकरी बदलली तर होणार सर्वाधिक 'फायदा'

कोरोनाची लाट सुरू असतानाही भारतीय उद्योग जगत 2021 या वर्षात सावरत आहे. कोरोनाचा परिणाम देशातील नोकरी देण्याच्या ट्रेंड्सवर होणार असून हेल्थ केअर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात नोकऱ्या तयार होणार आहेत.

    मुंबई, 13 जून : कोरोनाची लाट सुरू असतानाही भारतीय उद्योग जगत 2021 या वर्षात सावरत आहे. कोरोनाचा परिणाम देशातील नोकरी देण्याच्या ट्रेंड्सवर होणार असून हेल्थ केअर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात नोकऱ्या तयार होणार आहेत, असं गुरुग्राममधल्या आरजीएफ प्रोफेशनल रिक्रुटमेंट (Professional Recruitment) या ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंग फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 'RGF International Recruitment's Salary Watch 2021: India', असं या रिपोर्टचं नाव असून कोविड-19 महामारीचा भारतातील कॉर्पोरेट सेक्टरवर बराच परिणाम झाल्याचं यात म्हटलं आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील 19 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधी माहिती गोळा करून त्याचं एकत्रित विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यानुसार काही प्रोजेक्शन्स (Projections) म्हणजे भविष्यातील शक्यता या रिपोर्टमध्ये मांडण्यात आल्या आहेत. या शक्यतांनुसार नोकरी देणारे उद्योग आणि नोकरी मिळवू इच्छिणारे कर्मचारी यांना आपापले ठोकताळे बांधणं शक्य होणार आहे. या रिपोर्टमधील काही महत्त्वाचे मुद्दे 1) कोविड-19 महामारीचा भारतातील कॉर्पोरेट सेक्टरवर फार मोठा परिणाम झाला असून ह्युमन रिसोर्स, फायनान्स आणि ऍडमिन या क्षेत्रात काम करणाऱ्या एक्झिक्युटिव्हच्या (Executive) पगारामध्ये घट होण्याची शक्यता आहे. 2) या रिपोर्टमधील निरीक्षणांनुसार हेल्थकेअर सेवा आणि फार्मास्युटिकल प्रॉडक्शन क्षेत्रातील कौशल्यवान आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या पगारांत सुमारे 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे (Medical Sector) पगार 7 टक्क्यांनी तर प्रॉडक्शन आणि ऑपरेशन्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार 7 टक्क्यांनी वाढू शकतात. 3) सगळ्या क्षेत्रांतील अनुभवी व्यक्ती आणि संशोधन व विकास विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या वर्षी 7 टक्क्यांहून अधिक पगारवाढ मिळू शकते. या बदलत्या काळात अनुभव किंवा कौशल्याचा वापर करून सर्वसमावेशक मार्गदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही संधी मिळू शकेल. 4) या कोरोनाकाळामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यवसायांना डिजिटल स्ट्रॅटर्जीशी (Digital Strategy) जुळवून घेण्याची गरज भासली आहे. फिनटेकपासून हेल्थटेक आणि ई-कॉमर्स कंपन्यांपर्यंत लहान-मोठ्या सगळ्या कंपन्या व उद्योग डिजिटल ट्रान्सफॉरमेशनमधून जात आहेत. या कठीण काळात आपल्या ग्राहकांच्या डिजिटल पेमेंट, औषधं आणि वाण सामानासारख्या गरजा पुरवण्यासाठी या कंपन्यांना डिजिटायझेशन करणं भाग पडलं आहे. 5) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (Software Development),आर्टिफिशियल इंटिलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्या टेक्निकल टॅलेंटेड कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. अंदाजच बांधायचा झाला तर या क्षेत्रातील व्यक्तींना सरासरी वर्षाला 50 ते 80 लाख रुपयांप्रयंत पगार वाढ मिळू शकते तसंच जर त्यांनी नोकरी बदलली तर त्यांना आधीच्या पगाराच्या 40 टक्के अधिक पगार मिळू शकतो. ‘क्षमतावान कर्मचाऱ्यांची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं असून त्यामुळे भारतीय उद्योगांना सध्याच्या कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करता येईल तसंच दीर्घकालीन संकटांतही या कौशल्यवान मनुष्यबळाचा फायदा होईल,’ असं मत आरजीएफ प्रोफेशनल रिक्रुटमेंट इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केलं.
    First published:

    Tags: Jobs

    पुढील बातम्या