खंडाळा, 24 जून : कोणतंही यश हे बघून मिळत नसतं. तुमच्याकडे जिद्द, मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही वयाच्या कितव्याही वर्ष यश खेचून आणू शकता. हे शब्द आहेत अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी IAS झालेल्या स्नेहल धायगुडेचे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या स्नेहलची माती आणि गावाशी नाळ जोडल्यानं IAS होण्याचं स्वप्न होतं. 2018 रोजी तिने UPSC च्या परीक्षेत तिने देशात 108 क्रमांक मिळवून आपलं स्वप्न साकार केलं आहे.
खंडाळ्यातील रहिवासी असणाऱ्या स्नेहलचे वडील पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आई शेती करते. वडिलांवर स्नेहलप्रमाणेच इतर सख्ख्या चुलत भावंडांची जबाबदारी होती. त्यामुळे काटकसर करावी लागत होती. स्नेहलला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. तिनं मन लावून अभ्यास केला. इयत्ता आठवीनंतर वसतीगृहात राहण्यासाठी गेली आणि तिचा प्रवास सुरू झाला.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण साखरवाडी, लोणंद व माळेगाव इथे झाले.पुणे येथे बीएस्सी अॅग्री ही पदवी घेतल्यानंतर तिने UPSC करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कठोर मेहनत, मन लावून अभ्यास आणि आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव या सगळ्या गोष्टी मनात आणि डोक्यात ठेवून मन लावून अभ्यास केला आणि 21 व्या वर्षीच 2018च्या परीक्षेत स्नेहलनं उत्तुंग यश प्राप्त केलं.
स्नेहलाही करावा लागला या अडचणींचा सामना
खेडेगावातून आल्यानं भाषेचा प्रश्न होता. शुद्ध आणि नीट बोलता यावं यासोबतच इंग्रजी अधिक पक्क व्हावं यासाठी स्नेहलनं स्वत:वर मेहनत घेतली. बऱ्याचदा ती आपलं बोलणं, उत्तर रेकॉर्ड करून पुन्हा ऐकायची त्यामुळे त्यातील चुका समजायच्या असं स्नेहानं सांगितलं आहे.
असं म्हणतात की पांघरूण पाहून पाय पसरावेत तर मला वाटतं तुम्ही मोठी स्वप्न पाहा जिद्दीनं मेहनत घ्या नक्की आपलं पांघरुण आपण मोठं करू शकतो असं स्नेहलनं तरुणांना संदेश दिला आहे. तिच्या या उत्तुंग यशाचं देशभरातून कौतुक करण्यात आलं.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.