मुंबई, 29 मार्च- रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या मुलांना भारतात शिक्षण पूर्ण करण्याच्या संधीबाबत संभ्रम होता; मात्र आता अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या विद्यार्थ्यांना एमबीबीएस फायनल परीक्षेचा पार्ट 1 आणि पार्ट 2 उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येणार आहे; मात्र त्यांना एका वर्षाच्या आत मेडिकल अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना दोन वर्षांची इंटर्नशिप करावी लागेल. तसंच या विद्यार्थ्यांना फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची ही शेवटची संधी असेल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलंय.
(हे वाचा:Study Abroad: 12वीची परीक्षा संपली; आता परदेशात शिक्षणासाठी जायचंय? मग या गोष्टींसाठी करा रिसर्च )
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातल्या कॉलेजांमध्ये प्रवेश दिला जाईल; मात्र त्यांना एक वर्षाच्या आत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ही परीक्षा भारतातल्या मेडिकल कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित असेत.
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं की, ‘ज्या विद्यार्थ्यांना रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावे लागलं, त्यांना सध्या कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये नोंदणी न करता एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश मिळेल; मात्र त्यांना कॉलेजमधल्या थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकच संधी दिली जाईल. तसंच युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण करावी लागेल. या विद्यार्थ्यांकडून पहिल्या वर्षासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही; मात्र दुसऱ्या वर्षाचx शुल्क भरावं लागेल असा निर्णय एनएमसीद्वारे यापूर्वीच घेण्यात आला आहे.’
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे तिथे शिक्षण घेणारे अनेक भारतीय विद्यार्थी पुन्हा भारतात परतले होते. यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. शिक्षण अर्धवट सोडावं लागल्यानं या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं होतं. आता या विद्यार्थ्यांना मेडिकलची फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची शेवटची संधी मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.