दिल्ली, 17 जानेवारी : गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. तर काहींना व्यवसायात नुकसानही झालं. त्यानतंर अनेकांनी वेगळी वाट धरत व्यवसाय सुरू केले. आपलं शिक्षण आणि व्यवसाय याचा थेट संबंध नसला तरी आपल्या कौशल्याच्या जोरावर नव्या व्यवसायात यशही मिळवलं. आता सध्या अशाच एका महिलेची चर्चा होत आहे. एक चांगली नोकरी सोडून शर्मिष्ठा घोष नावाच्या महिलेनं चहाचं दुकान सुरू केलं. खरंतर चहाचं दुकान सुरू केलं यात काही मोठी बाब नाही पण इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्स पूर्ण केलेलं आणि ब्रिटीश काउन्सिलमध्ये त्या नोकरी करत होत्या. ही नोकरी सोडून चहाचं दुकान सुरू केलं.
शर्मिष्ठा यांनी दिल्ली कँटमधील गोपीनाथ बाजार इथं चहाचा स्टॉल लावला आहे. शर्मिष्ठा यांची ही गोष्ट लिंक्डइनवर लष्करातील निवृत्त ब्रिगेडियर संजय खन्ना यांनी शेअर केली होती. त्यांनी म्हटलं आहे की, जेव्हा मी शर्मिष्ठा यांना विचारलं की तुम्ही हा निर्णय का घेतला तेव्हा त्या म्हणाल्या की टी स्टॉलला चायोस इतकं मोठं करायचं आहे.
हेही वाचा : Shark Success Story: तब्बल 1 कोटीची नोकरी नाकारून तिनं 10,000 मध्ये केलं काम; आज करतेय करोडोंची उलाढाल
खन्ना यांनी पुढे सांगितलं की, शर्मिष्ठा ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीत कार्यरत होत्या. पण त्यांनी नोकरी सोडून चहाचा स्टॉल सुरू केला. यात त्यांच्या एका मैत्रिणीनेसुद्धा साथ दिली आहे. तीसुद्धा लुफ्थांसा एअरलाइन्समध्ये काम करत होती. एका युजरने ब्रिगेडियर खन्ना यांच्या पोस्टवर म्हटलं की, मी तुमच्या भावनांशी सहमत आहे की, कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. शर्मिष्ठा आणि भावना राव यांची गोष्ट प्रेरणादायी आहे. यातून दिसतं की कष्ट आणि चिकाटी याच्या जोरावर काहीही शक्य आहे.
दरम्यान, एका युजरने मात्र इतकं शिक्षण घेतल्यानतंर चहाचा स्टॉल सुरू करण्यात काय अर्थ आहे असं विचारलंय. तुमच्या शिक्षणाचा वापर शिकवण्यासाठी करू शकता. तुमचं स्वप्न जर फूड चेन सुरू करणं असेल तर त्याआधी ग्रॅज्युएशन आणि चांगल्या नोकऱ्या कशासाठी केल्या? ब्रिगेडियरजी तुम्ही एका असंघटीत व्यवसायाला प्रोत्साहन देत आहात आणि हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही. असं असलं तरी अनेकांनी मात्र या पोस्टवर कौतुक केलं असून हे प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career