मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनानं संपूर्ण जगात धुमशान घातलं असताना केवळ हा संसर्गच नाही तर त्यासोबत अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे. या कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांचे रोजगार गेले अर्थव्यवस्था आणि घरातलं बजेट दोन्ही कोलमडलं. लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद असल्यानं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर हात ठेवून बसून घर चालणार नव्हतं त्यामुळे हातातली कला आणि मनातली जिद्द या जोरावर मराठी तरुणानं एक व्यवसाय सुरू केला.
Taj Sats हॉटेल सारख्या 7 स्टार हॉटेल्स आणि इंटरनॅशन क्रूझवर 8 वर्ष शेफ म्हणून काम केलेल्या अक्षय प्रविण पारकर या तरुणाला लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गमवावी लागली. शांत बसून तर घर चालणार नव्हतं. लॉकडाऊन काळात नोकरी मिळवणं कठीण होतं. अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि हातातल्या कलेनं अक्षयला पाठबळ दिलं आणि त्यानं मुंबईतील दादर परिसरात बिर्याणीचा छोटा स्टॉल मोठ्या हिमतीनं सुरू केला.
Dm for orders 😊🙏Posted by Akshay Parkar on Tuesday, 17 November 2020
सुरुवातीला अक्षयला अनेका संकटांचा सामना करावा लागला. पण मोठ्या हिमतीनं त्यानं दादरमध्ये छोट्या जागेत आपला व्यवसाय सुरू केला. आज अक्षय वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणीच्या ऑर्डर घेऊन तशीपद्धतीनं तयार करून देतो. या स्टॉलचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अक्षयने दादर परिसरातील जेके सावंत मार्गावर आपला स्टॉल ठेवला. अक्षय तिथे व्हेज बिर्याणी 800 रुपये किलो आणि नॉन-वेज बिर्याणी 900 रुपये प्रतिकिलोला विकतो. फेसबुकवर आपली कहाणी शेअर केल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केलं आहे.