मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

शाळा झाल्या सुरू; मात्र विद्यार्थ्यांमध्ये उद्भवलेल्या नव्या त्रासामुळे पालकांसह शिक्षकही चिंतेत

शाळा झाल्या सुरू; मात्र विद्यार्थ्यांमध्ये उद्भवलेल्या नव्या त्रासामुळे पालकांसह शिक्षकही चिंतेत

कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे; पण त्यामुळे झालेले परिणाम अजूनही जाणवत आहेत.

कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे; पण त्यामुळे झालेले परिणाम अजूनही जाणवत आहेत.

कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे; पण त्यामुळे झालेले परिणाम अजूनही जाणवत आहेत.

नवी दिल्ली, 24 मार्च : कोरोनाच्या (Corona) महामारीचे विविध परिणाम सगळ्यांवरच झाले. त्यात लहान मुलांवर झालेले परिणाम तर काळजी वाढवणारेच आहेत. कोरोनामुळे जवळपास दोन वर्षं बंद असलेल्या शाळा जेव्हा परत सुरू झाल्या (Schools Reopen) तेव्हा लहान मुलांमधल्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये (Eye Related Problems) वाढ झाल्याचं लक्षात येऊ लागलं आहे. दिल्ली एनसीआर (Delhi NCR), मुंबई (Mumbai) आणि उदयपूरमध्ये (Udaipur) तर चष्मा घालणाऱ्या मुलांच्या संख्येत गेल्या सहा महिन्यांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याचं डोळ्यांच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच धूसर दिसणं, (Blur Vision) अस्वस्थता, डोकेदुखी, लक्ष न लागणं, डोळे लाल होणं या समस्यांमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे. नवी दिल्लीतल्या AIIMS या भारतातल्या सर्वांत मोठ्या सार्वजनिक हॉस्पिटलमध्येही हेच चित्र आहे. याबाबत विविध शहरांतल्या नेत्रतज्ज्ञांनी न्यूज 18 शी बोलताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

अनेक राज्यांमध्ये आता शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत; मात्र आता अनेक मुलांना वर्गात फळ्यावर लिहिलेलं नीट दिसत नाही किंवा धूसर दिसत असल्याचं किंवा एकाग्रता कमी झाल्याचं पालक आणि शिक्षकांच्या लक्षात येत आहे. दुसरीकडे गेल्या तीन महिन्यांमध्ये 5 ते 15 वर्षं वयोगटांतल्या अनेक मुलांसाठी चष्मा किंवा अगदी हाय पॉवरचा चष्मा (High Power Spectacle) लावण्याचा सल्ला डॉक्टर्सनी विशेषत: नेत्रतज्ज्ञांनी (Eye Specialist) दिला आहे.

जवळचं कमी दिसणं म्हणजे लघुदृष्टिदोषाच्या तक्रारींमध्ये दुप्पटीनं वाढ झाली आहे. हे प्रमाण 7% वरून 13% पर्यंत पोहोचलं असल्याची माहिती नवी दिल्लीतल्या AIIMS मधल्या डॉ. आर. पी. सेंटरमधल्या कम्युनिटी ऑप्थॅल्मॉलॉजीचे प्राध्यापक आणि मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण वसिष्ठ यांनी दिली.

'जवळचं बघण्यात झालेली प्रचंड वाढ आणि बाह्य जग बघण्यात झालेली घट हे लांबचं धूसर दिसणं किंवा अंधूक दिसण्याच्या तक्रारी वाढण्यामागचं मुख्य कारण आहे. हे प्रमाण अगदी दुपटीनं वाढलं नसलंसृ, तरी शाळकरी मुलांमध्ये मायोपिया (Myopia) म्हणजे अंधूक दिसण्याच्या तक्रारींमध्ये 1.5 पटीनं वाढ झाली आहे,' असं डॉ. वसिष्ठ यांनी सांगितलं.

कोविड-19 महामारीनंतर पुढच्या एक वर्षात मुलांमध्ये निर्माण झालेल्या दृष्टिदोषांचं मूल्यांकन करण्यासाठी जवळपास एक लाख मुलांची तपासणी करून त्याची नोंद करण्याचं या विभागानं ठरवलं आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सनीही हीच चिंता व्यक्त केली आहे.

मुंबईतही दर 20 मुलांमागे 14 मुलांना दृष्टी कमी झाल्याच्या तक्रारी असल्याचं किंवा चष्मा लावणं आवश्यक झाल्याचं मुंबईतल्या SRCC लहान मुलांच्या हॉस्पिटलमधल्या नेत्रतज्ज्ञ डॉ. नीपा दवे-ठक्कर यांचा अनुभव आहे. हे हॉस्पिटल नारायण हेल्थ या हॉस्पिटल साखळीचा एक भाग आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तातडीची अशी गरज लागणाऱ्या मुलांची संख्या 20 मुलांमागे सात इतकी होती.

'तातडीची वैद्यकीय गरज लागणाऱ्या मुलांची संख्या आता दुपटीनं वाढली आहे. ज्या मुलांना यापूर्वी कधीही दृष्टिदोषाच्या समस्या नव्हत्या, त्यांची दृष्टीही कमकुवत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्याच तपासणीत या मुलांना जवळपास 1 किंवा 1.5 पॉवरपेक्षा जास्त पॉवरचा चष्मा लावणं आवश्यक असल्याचं लक्षात येतं. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर डोळ्यांच्या तपासणीसाठी येणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जेव्हा मुलं फळ्यावर लिहिलेलं स्पष्टपणे पाहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत तेव्हा शिक्षक आणि पालकांच्या ही समस्या लक्षात येते,' असं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा-Study Abroad: भारतातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी Canada लाच का देतात पसंती? इथे मिळेल उत्तर

अर्थातच वाढलेला स्क्रीनटाइम (Increased Screen Time) हे यामागचं मुख्य आणि प्राथमिक कारण आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मुलांच्या मोबाइल फोन्स आणि लॅपटॉपवरच्या स्क्रीन टाइममध्ये भरपूर वाढ झाली आहे. फोन किंवा लॅपटॉपसारख्या स्क्रीनकडे बघण्याचा वेळ वाढतो तेव्हा डोळ्यांतल्या बुबुळांवरचा (Eyeballs) ताण वाढतो आणि उष्णता निर्माण होते. यामुळे जवळचा दृष्टिदोष निर्माण होतो. त्याशिवाय सूर्यप्रकाश न मिळाल्याममुळे व्हिटॅमिन D चा अभाव (Vitamin D) हेही डोळ्यांच्या तक्रारी वाढण्यामागचं कारण आहे.

'मुलं जेव्हा सूर्यप्रकाशात खेळतात तेव्हा अन्य जीवनसत्त्वांबरोबरच ड जीवनसत्त्व, डोपामाइन त्यांच्या शरीरात स्रवतं. जितका मोठा स्क्रीन असेल तितका तो दृष्टीसाठी कमी हानिकारक असतो. लॉकडाउन आणि शाळा बंद असल्यामुळे डोळ्यांसाठी जे वाईट आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ झाली आणि आमच्याकडे येणाऱ्या दर 10 मुलांमागे 6 मुलांना दृष्टिदोष निर्माण होत असल्याचं लक्षात येतं,' असं गुरुग्राममधल्या मॅक्स हेल्थकेअरमधल्या नेत्रतज्ज्ञ डॉ. अपर्णा गुप्ता यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुलांना दररोज किमान दोन तास तरी सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे तसंच स्क्रीन टाइम कमी केल्यास दृष्टिदोषाच्या तक्रारींमध्ये घट होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं आहे. 'शाळा पुन्हा सुरू झाल्यानं मुलांचं बाहेर खेळणं, बाहेरच्या जगाशी संपर्क येणं वाढलं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या शक्तीमध्ये जवळपास 0.50 नं वाढ झाल्याचंही काही मुलांमध्ये दिसलं,' असंही त्या म्हणाल्या.

डोळ्यांची चुरचुर होणं, डोळे कोरडे होणं, डोळे जास्त प्रमाणात चोळले जाणं, अंधूक दृष्टी, लाल आणि अस्वस्थ डोळे अशा तक्रारी मुलांना जाणवत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. ही सगळी डोळ्यांच्या स्नायूंमधला बिघडलेला समतोल आणि डोळे कोरडे होण्याची लक्षणं आहेत.

'गेल्या वर्षी जी मुलं आधीपासूनच चष्मा लावत होती त्यांच्या चष्म्याच्या नंबरमध्ये अतिरिक्त 0.50 ते 0.75 ने वाढ झाल्याचं लक्षात येत आहे,' असं ठक्कर यांचं म्हणणं आहे. म्हणजेच डोळ्यांवर अतिरिक्त ताण वाढल्यानं ही सगळी लक्षणं निर्माण होतात असा याचा अर्थ आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आपल्याकडे मुलांना नियमितपणे डोळे तपासणीसाठी नेण्याची पद्धत नाही आणि हे अत्यंत चुकीचं आहे, असं मत उदयपूरमधल्या पारस जेके हॉस्पिटलमधल्या नेत्रतज्ज्ञ डॉ. रचना जैन यांनी व्यक्त केलं. डोळ्यांच्या तक्रारी असोत किंवा नसोत, पण मूल पाच वर्षांचं होईपर्यंत त्याच्या डोळ्यांची पहिली तपासणी होणं गरजेचं आहे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 'फक्त स्क्रीन टाइम वाढल्यामुळेच नाही तर शाळा प्रत्यक्ष बंद असल्यानं मुलांना ऑनलाइन क्लासेस करावे लागत होते. शाळेत बसताना त्यांच्यासाठी विशेष बाकं असतात; पण घरी ऑनलाइन क्लास करताना अशी बाकं नव्हते. घरच्या टेबल-खुर्च्या मोठ्यांच्या कामाच्या दृष्टीने बनविलेल्या असतात. अशा स्थितीत बसून जास्त वेळ ऑनलाइन क्लासेस करणं हेही यामागचं एक कारण आहे,' असं डॉ. जैन यांचं म्हणणं आहे. लॅपटॉपवर काम करताना त्याची स्क्रीन आपल्या डोळ्यांपेक्षा 15% खाली असेल अशा पद्धतीने स्टूल्स किंवा सीट असल्या पाहिजेत, असं डॉ. जैन यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोटदुखी किंवा दीर्घकाळ त्रास देणारी पाठदुखी थांबवता येऊ शकते आणि हातालाही आधार मिळतो, असं त्यांनी सांगितलं.

पूर्वीच्या काळी किंवा गोष्टीच्या पुस्तकांमध्ये मुलांचं अभ्यासाचं टेबल हे नेहमी खिडकीजवळ ठेवलेलं दिसायचं. तिथून मुलाला बाहेरचं विश्व, निसर्ग सहज दिसू शकायचा. डोळ्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचा हा आदर्श मार्ग होता, असं डॉ. जैन यांचं म्हणणं आहे.

'अभ्यास करताना, टीव्ही पाहताना किंवा अगदी लॅपटॉपवर काम करातानाही दर 15 ते 20 मिनिटांनी छोटासा ब्रेक घेऊन 6 फूट पलीकडचं दृष्य पाहण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांच्या स्नायूंसाठीचा हा व्यायाम आहे. यामुळे डोळे निरोगी राहतात, त्यांची हालचाल योग्य होते आणि दृष्टीही स्थिर होते,' असं उदयपूरच्या डॉ. जैन यांनी सांगितलं.

'तुम्ही जमिनीवर पाय पसरून ते एकमेकांत गुंतवून खूप वेळ बसा, तुम्हाला पायात कळ येण्याचं जाणवायला लागेल,' असं त्या म्हणतात. अगदी तसंच आपण सतत आणि खूप जास्त वेळे स्क्रीनकडे अगदी एकटक बघतो, तेव्हा डोळ्यांचे स्नायूही दुखावतात. त्यानंतर आपण जेव्हा ते हलविण्याचा प्रयत्न करतो, त्याला मोकळं व्हायला वेळ लागतो. अशा वेळेस आपण लांबचं पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लांबचं धूसर किंवा अंधूक दिसतं.

डोळे कोरडे होण्याचा त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी डोळ्यांचे ड्रॉप्स वापरणं, ठराविक वेळाने वारंवार डोळ्यांची उघडझाप करणं आणि कामातून दर थोड्या वेळाने ब्रेक घेणं हे तर गरजेचं आहेच; पण त्याशिवाय स्क्रीन टाइम कमी करणं हा सगळ्यांत महत्त्वाचा उपाय आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लॅपटॉपचा स्क्रीन आपल्यापासून एका हाताच्या अंतरावर असणं आवश्यक आहे. त्याचा ब्राइटनेस 60% ते 70% टक्के इतकाच असावा. मोबाइल फोन्स किंवा लॅपटॉप जास्त वेळ वापरायचा असेल तर मुलांना ब्लू फिल्टर स्क्रीन किंवा चष्मा लावणं आवश्यक आहे असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे; पण त्यामुळे झालेले परिणाम अजूनही जाणवत आहेत. आता मात्र मुलांचा स्क्रीन टाइम कमी करून त्यांना जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत खेळायला पाठवणं हा त्यांच्या डोळ्यांच्या आणि मानसिक आरोग्यासाठीही उत्तम उपाय आहे.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Eyes damage, Health, School