केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (CBSE) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (CBSE 10th 12th Result 2021) नुकताच जाहीर झाला. हे विद्यार्थी त्यांची मार्कशीट आणि प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात पाहू शकतात. त्यासाठी सरकारने ही कागदपत्रं डिजिलॉकर (Digi locker) सुविधेद्वारे उपलब्ध करून दिली आहेत. याकरिता विद्यार्थ्यांना प्रथम डिजिलॉकर हे अॅप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर या अॅपमध्ये, ‘issued documents section’ मध्ये जाऊन त्यांना मार्कशीट आणि प्रमाणपत्र पाहता येईल. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाचा भाग असलेलं डिजिलॉकर हे मोबाइल अॅप (Mobile App) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 2015 मध्ये सुरू केलं असून, ते आयटी कायदा 2000 अंतर्गत वैध आहे. म्हणजेच या सरकारी संस्थांकडून इश्यू झालेली डॉक्युमेंट्स फिजिकल डॉक्युमेंट्सप्रमाणेच वैध मानली जातात. 2016मध्ये या अॅपचे 20 लाख 13 हजार युझर होते आणि त्यात 24 लाखांपेक्षा अधिक कागदपत्रं (Documents) जमा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व महापालिका संस्थांना डिजिलॉकर वापरण्याचं आवाहन केलं. त्यामुळे या अॅपच्या युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
हे वाचा - Explainer: बोर्डाच्या परीक्षेत नेहमी मुलीच का ठरतात अव्वल? कधी विचार केलाय? इथे मिळेल उत्तर
हे अॅप अँड्रॉइड 5 किंवा त्यापुढच्या व्हर्जनच्या फोनवर, तसंच वेब ब्राउझरवरदेखील (Web Browser) वापरता येऊ शकतं. https://digilocker.gov.in/ ही त्याची अधिकृत वेबसाइट आहे. हे अॅप वापरण्यासाठी प्रथम तुम्हाला यावर स्वतःची नोंदणी करावी लागेल. ती माहिती व्हेरिफाय झाल्यावर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रं इथं सेव्ह करू शकता आणि त्याची पडताळणी करू शकता.
या डिजीलॉकरमध्ये शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीटसह आधार कार्ड, कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसेन्स, तसंच एचएससी मार्कशीट, रेशन कार्ड, रेसिडेन्स सर्टिफिकेट, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रं सेव्ह करता येतात. या अॅपद्वारे 1 जीबी स्टोरेज स्पेस उपलब्ध केली जाते. डिजीलॉकर वापरण्यासाठी युझरला आपला आधार क्रमांक (Aadhaar Number) द्यावा लागतो. आधार क्रमांक दिल्यानंतरच या अॅपवर साइन अप करता येतं. त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जातो. तो डिजीलॉकर अॅपमध्ये टाकावा लागतो. त्यानंतर हे अॅप बीटा व्हर्जनवर काम सुरू करतं. तुम्ही यावर 10 एमबीपेक्षा कमी आकाराची कोणतीही फाइल अपलोड करू शकता.
निकाल पाहण्यासाठी :
- सर्वांत आधी digilocker.gov.in वर जा किंवा Digi locker App डाउनलोड करा.
- आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- त्यानंतर शिक्षण विभागात जा आणि CBSE या पर्यायावर क्लिक करा.
- सीबीएसई 12 वी निकाल पर्याय दिसेल. तिथून तुम्ही प्रमाणपत्र आणि मार्कशीट डाउनलोड करू शकता.
- रोल नंबरसह लॉग इन करा आणि प्रमाणपत्र आणि मार्कशीट डाउनलोड करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBSE