नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: देशातील सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांसाठी (PSU Bank Employee) एक आनंदाची बातमी आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ही (Family Pension) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची फॅमिली पेन्शन ज्या सूत्रानुसार निश्चित केली जाते त्याच सूत्राने दिली जाणार आहे. आतापर्यंत बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनला किमान आणि कमाल रकमेची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये चांगली वाढ होणार आहे. बँक कर्मचारी बऱ्याच काळापासून पेन्शन सुधारणेची मागणी करत आहेत, आता किमान फॅमिली पेन्शनमध्येबाबत तरी सुधारणा झाल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल बँक कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या उपस्थितीत काल मुंबईत (Mumbai) झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वार्षिक (FY 2020-21) कामगिरी आढावा बैठकीत (PSU Bank’s Annual Review Meeting) हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 12 बँकांचे प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अर्थात एनपीएसचे संरक्षण नसलेल्या बँक कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असून, 1एप्रिल 2021पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आता नवीन निर्णयानुसार, या पुढे बँक कर्मचाऱ्याच्या (Bank Employee) पश्चात त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के फॅमिली पेन्शन मिळेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुमारे 1.25 लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होईल. त्याचबरोबर राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत (NPS) समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेले योगदान आता 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या पेन्शन फंडात चांगली भर पडणार आहे.
यापूर्वी बँक युनियन (Bank Union) आणि बँक व्यवस्थापन (Bank Management) यांच्यातील 10 व्या वेतन करारानुसार बँक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला किमान 2785 रुपये आणि कमाल 9284 रुपये पेन्शन मिळत होते, तर 11व्या करारानुसार किमान रक्कम 3,985 आणि कमाल रक्कम 13,280 रुपये होती. आता मात्र कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के दराने फॅमिली पेन्शन उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे त्यावर महागाई भत्तादेखील (Dearness Allowance) मिळणार आहे. यामुळे फॅमिली पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार आहे. समजा, सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये असेल तर त्याच्या पश्चात मूळ वेतनाच्या 30 टक्के म्हणजे 15 हजार रुपये फॅमिली पेन्शन निश्चित केले जाईल. त्यानंतर त्यावेळी चालू असलेल्या दराने त्यावर महागाई भत्तादेखील दिला जाईल. उदाहरणार्थ, सध्या महागाई भत्ता 27 टक्क्याने दिला जातो, त्यानुसार 15 हजार रुपयांवर 4050 रुपये महागाई भत्ता अशी एकूण 19 हजार 50 रुपये एवढी रक्कम त्या कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.