धर्म की विज्ञान, सर्वात महत्त्वाचं काय? IAS मुलाखतीत मुलीनं दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क

धर्म की विज्ञान, सर्वात महत्त्वाचं काय? IAS मुलाखतीत मुलीनं दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क

धर्म की विज्ञान, सर्वात महत्त्वाचं काय? या प्रश्नाचं उत्तर देऊन तरुणीनं IAS परीक्षेत मिळवला 20 वा क्रमांक

  • Share this:

मुंबई, 06 डिसेंबर : तुमच्यापेक्षा इतरांचे दुःख मोठे असते, हा दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य सोपं वाटेल, या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या कोलकात्याच्या नेहा बॅनर्जीने 2019 च्या युपीएससी (Union Public Service Commission केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेत 20 वा क्रमांक मिळवला होता. नोकरी करत तयारी करूनही तिने पहिल्याच फटक्यात ही परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीत तिला विचारलेल्या एका अवघड प्रश्नाला तिने दिलेल्या संतुलित उत्तराने तिचे ध्येय सहजसाध्य झाले. बुद्धिमत्ता आणि उच्च विचारांच्या आधारावर हे यश मिळवणाऱ्या नेहाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जाणून घेऊ या तिचा हा प्रवास.

मूळची कोलकात्याची असलेली नेहा बॅनर्जी (Neha Banerjee) 2019 च्या तुकडीची आयएएस अधिकारी आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या नेहाने नोकरी करताकरता लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच फटक्यात यश मिळवले.

2011 मध्ये तिच्या वडीलांचे निधन झाले. या आघाताने खचून न जाता तिच्या आईने एकटीनेच तिला वाढवले. अभ्यासात हुशार असणाऱ्या नेहाने आईच्या कष्टाचे चीज करत, 2018 मध्ये आयआयटी खरगपूर इथून इंजिनीअरिंग (IIT Khragpur) पूर्ण केले आणि नोएडातील एका कंपनीत नोकरीही मिळवली. नोकरी करत असतानाच तिने यूपीएससी अर्थात लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा विचार केला. नोकरी करतच तिने या परीक्षेची तयारी केली आणि मुलाखतीच्या 15 दिवस आधी नोकरीचा राजीनामा दिला. मुलाखतीसाठी देखील तिने स्वतःच तयारी केली होती. त्यामुळेच कदाचित ती मुलाखतीत अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे देऊ शकली.

हे वाचा-'त्यांना पुन्हा प्रेम मिळालं', वडिलांच्या पुनर्विवाहाचे मुलानं शेअर केले PHOTO

आयआयटीत शिकत असताना तिला एक विज्ञान विषयाची शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळत होती. त्याआधारे तिला एक कठीण प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला. त्याचे तिने अगदी मार्मिक उत्तर दिले. तिला विचारण्यात आले होते की, विज्ञान आणि धर्म यात महत्त्वाचे काय आहे ? त्यावर हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, असं उत्तर तिने दिले. तेव्हा मुलाखतकर्त्यांनी विचारलं की, विज्ञान हे तर्कावर आधारीत आहे, आणि धर्म हा आपल्या विश्वासावर आधारित आहे. तुम्ही काय महत्त्वाचे मानता?

हा प्रसंग सांगताना नेहा म्हणाली की, ‘अशा प्रश्नांद्वारे तुमचे व्यक्तिमत्त्व जाणून घेतले जाते. मी देखील या प्रश्नाचे संतुलित उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी म्हटले, ‘या दोन्हींची भूमिका वेगवेगळी आहे. या दोन्ही बाबींना एकत्र करण्याची काय गरज आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या दिशांना नेतात. विज्ञान आपल्याला एका वेगळ्या दिशेने पुढे नेते तर धर्म एक वेगळी ताकद देतो.’ हे उत्तर मुलाखत घेणाऱ्यांना आवडले.’

या परीक्षेच्या तयारीबाबत बोलताना नेहा म्हणाली, ‘या परीक्षेची तयारी करताना, माझी इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असल्याने मी थोडी काळजीत होते. सुरुवात मी वर्तमानपत्रं वाचण्यापासून केली. त्यानंतर मी अभ्यासक्रम आणि त्याच्या तयारीची पद्धत समजून घेतली. इतिहास, भूगोल, पॉलिटिक्स, जनरल सायन्स अशा विषयांचा अभ्यास करणंही आवडू लागलं. या परीक्षेतील टॉपर्सच्या मुलाखती ऐकल्या. अनेकांनी मला प्रभावित केलं. मला आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नव्हतं त्यामुळं नोकरी चालू ठेवूनच या परीक्षेची तयारी केली आणि अखेर ध्येय साध्य केलेच.’

अभ्यासक्रम समजून घेऊन व्यवस्थित नियोजन करून कठोर परिश्रम केले तर ही परीक्षा सहज उत्तीर्ण होता येते, असा सल्ला नेहाने दिला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 6, 2020, 7:08 AM IST
Tags: career

ताज्या बातम्या