नवी दिल्ली, 16 जानेवारी : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-पीजी (NEET-PG) परीक्षेच्या तारखांची घोषणा नॅशनल एलिजिबिलीटी कम एंट्रन्स टेस्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षा मंडळानं (NBE) केली आहे. 18 एप्रिल 2021 रोजी ही प्रवेश परीक्षा होणार आहे.
नीट-पीजी 2021 (NEET-PG-2021) देशभरात अनेक परीक्षा केंद्रांमध्ये ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. यासंदर्भातील सर्व सविस्तर माहिती देणारं बुलेटीन 2021 आणि अर्ज अद्याप उपलब्ध करण्यात आलेले नाहीत; परंतू ते लवकरच natboard.edu.in आणि nbe.edu.in या वेबसाईटसवर उपलब्ध होतील, असं परीक्षा मंडळानं म्हटलं आहे.
दरम्यान, या तारखा जाहीर करतानाच परीक्षा मंडळानं या परीक्षेची 18 एप्रिल ही तारीख बदलण्याची किंवा पुढे ढकलण्याची शक्यताही वर्तवली आहे.
नीट-पीजी 2021 (NEET-PG-2021) बाबत दहा महत्त्वाच्या सूचना :
1. नीट-पीजी परीक्षा (NEET-PG) दर वर्षी मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), डॉक्टर ऑफ मेडिसीन (एमडी) आणि डिप्लोमाच्या जागांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.
2. कोणतीही अकस्मात आपत्ती विचारात घेऊन, या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला जाईल किंवा त्या पुढे ढकलल्या जातील. या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय परिषद आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करून घेतला जाईल.
3. नीट-पीजी 2021 (NEET-PG-2021) परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे भारतीय वैद्यकीय परिषदेची (एमसीआय) मान्यता असलेल्या संस्थेचे तात्पुरते किंवा कायमचे एमबीबीएस डिग्री प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4. या उमेदवारांकडे भारतीय वैद्यकीय परिषद किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडून जारी केलेले तात्पुरते किंवा कायम नोंदणी प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे.
5. नीट-पीजी 2021 (NEET-PG-2021) परीक्षेसाठी विहित पात्रतेच्या निकषानुसार परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी 30 जून 2020 रोजी किंवा त्यापूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केलेली असणं अनिवार्य आहे.
6. जम्मू-काश्मीरमधून एमबीबीएस पूर्ण करणारे उमेदवार, 50 टक्के अखिल भारतीय कोट्याअंतर्गत (एआयक्यू) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांवर प्रवेश घेण्यास पात्र आहेत.
7. परीक्षा मंडळाकडून नीट-पीजी 2021साठीची (NEET-PG-2021) परीक्षा केंद्रे आणि इतर सर्व माहिती मंडळांच्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in आणि nbe.edu.in यावर जाहीर केली जाईल. गेल्या वर्षी 2020 मध्ये, ही परीक्षा देशातील 162 शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.
8. या परीक्षेसाठी अर्ज भरताना इच्छुकांना आपल्या सोयीचे शहर दिलेल्या शहराच्या यादीतून निवडावे लागेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्वावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रे देण्यात येतील.
9. 2020 मध्ये 1 लाख 67 हजार 102 उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 1 लाख 60 हजार 888 उमेदावारांनी ऑनलाइन परीक्षा दिली.
10. नीट पीजी (NEET-PG-2021) परीक्षेअंतर्गत एमएससाठी 10 हजार 821, एमडीसाठी 19 हजार 953 जागा, तर पदव्युत्तर डिप्लोमासाठी 1 हजार 979 जागा आहेत. देशभरातील 6 हजार 102 खासगी, अभिमत, सरकारी आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये या जागा उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.