Home /News /career /

10वी-12वी चा तिढा! देशभरातील परीक्षांबाबत केंद्राने समान धोरण ठरवावं - शिवसेना खासदारांची मागणी

10वी-12वी चा तिढा! देशभरातील परीक्षांबाबत केंद्राने समान धोरण ठरवावं - शिवसेना खासदारांची मागणी

विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, परीक्षा घेणारे कर्मचारी या सर्वांनाच कोरोना संसर्गाचा मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. देशभर एकच काय तो परीक्षांचा नियम करा, असं आवाहन शिवसेना खासदारांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना केलं आहे.

    मुंबई, 10 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) प्रादुर्भाव पाहता दहावी-बारावीबरोबरच (class X XII board exam dates) महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या परीक्षांवरही टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. देशभरात अशीच परिस्थिती असल्याने प्रत्येक राज्याने स्वतंत्र वेगळा निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारनं यात पुढाकार घेऊन संपूर्ण देशासाठी एकसमान धोरण ठरवावं, अशी विनंती शिवसेना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केली आहे. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती भयंकर आहे. महाराष्ट्रात तर चाचण्यांची संख्या पाहता रुग्णांचा आकडा सर्वोच्च आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी दहावी, बारावी किंवा महाविद्यालय अथवा विद्यापीठाची परीक्षा देणार आहेत. मात्र लसीकरणाच्या वयोगटात हे विद्यार्थी बसत नसल्याने त्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, परीक्षा घेणारे कर्मचारी या सर्वांनाच कोरोना संसर्गाचा मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कंटेनमेंट झोनमधीलही आहेत. त्यामुळं हा धोका अधिक बळावत असल्याची स्थिती अरविंद सावंत यांनी पत्राद्वारे मांडली आहे. राज्य शिक्षण बोर्डाबरोबर काही राष्ट्रीय शिक्षण बोर्ड आणि काही आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाचे विद्यार्थीही आहेत. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या राज्याने संबंधित राज्यातील विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतल्यास तो त्यांच्या करिअर आणि भविष्यातील संधीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो, अशी शक्यताही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. MPSC नंतर दहावी-बारावी परीक्षाही पुढे ढकलणार का? पाहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री या सर्वाचा विचार करून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं संपूर्ण देशाच्या वतीनं पुढाकार घेऊन, सर्व विद्यार्थ्यासाठी एक समान धोरण ठरवावं, अशी विनंती सावंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल यांच्याकडं केली आहे. यावर लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. राज्य सरकारनं नुकत्याच राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा पुढं ढकलंत त्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पण दहावी-बारावीच्या परीक्षांवर कोरोनाची टांगती तलवार असल्यानं नेमकं काय होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता केंद्र सरकार याविषयी हस्तक्षेप करणार का हेही पाहावं लागेल. दरम्यान, राज्यात एमपीएससीच्या परीक्षा पुढं ढकलल्यानंतर कोरोनाचे गांभीर्य विचारात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढं ढकलण्याची मागणी मंत्री बच्चू कडू यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: HSC, Ssc board

    पुढील बातम्या