बारामती, 1 ऑगस्ट: तुम्ही जर मनात एखादी गोष्ट मिळवण्याचा पक्का निर्धार केला असेल तर तुमच्यासाठी काहीच अवघड नसतं, हे एका आईनं करून दाखवलं आहे. घरकाम आणि शिवणकाम करून एका महिलेनं चक्क आपल्या मुलासोबत अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. बेबी गुरव असं या माऊलीचं नाव असून तिनं दहावीत 64.40 तर तिचा मुलगा सदानंद यानं 73.20 टक्के मिळवले आहेत.
हेही वाचा.. SSC Result: मुलीनं मिळवले 96 टक्के; धुणीभांडी करणाऱ्या आईच्या कष्टाचं झालं चीज
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील बेबी गुरव या टेक्सटाईल पार्कमध्ये पायनियर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. आर्थिक परिस्थितीमुळे बेबी गुरव याचं दहावी उत्तीर्ण होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. पूर्ण शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा होती. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. मात्र, बेबीताईंचा मुलगा सदानंद दहावीत शिकत होता, तेव्हा त्यांची अभ्यासाची इच्छा आणखीनच दृढ झाली. त्यात बेबीताईंना पती प्रदीप यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं. पतीचं पाठबळ आणि मुलाचं समर्थन मिळल्यानं बेबीताईंनी पुन्हा पुस्तक हातात घेतलं. झपाटून अभ्यास केला.
घरकाम आणि शिवणकामातून वेळ काढून बेबीताईंनी सदानंदसोबत अभ्यास करण्यास सुरवात केली. मुलगा सदानंदनं आईला गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे विषय समजावून सांगितले. स्वयंपाक करत असताना तो आईचा अभ्यास घेत होता. मुलासोबतच दहावीची परीक्षा देऊन या मायलेकानं घवघवीत यश संपादन करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
तसं पाहिलं तर कोरोनामुळे यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Result 2020) दहावीचा निकाल उशीरा जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता.
हेही वाचा...MSBSHSE SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, गुणपडताळणीसाठी इथे कराल ऑनलाइन अर्ज
यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.