मुंबई, 26 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या आणि राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकल्यात आल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावं यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. तसंच दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
CBSC बोर्डाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. 12वीच्या परीक्षा कधी घ्यायच्या यासंदर्भातील निर्णय 1 जून नंतर घेण्यात येणार आहे.
(वाचा - Maharashtra SSC Exam: 10वीची परीक्षा रद्द; 12वीच्या परीक्षा होणार, ठाकरे सरकारचा निर्णय)
देशातील बहुतेक बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. केवळ CBSC, ICSE नाही तर देशभरातील एकूण सात राज्यातील शिक्षण मंडळांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Exam