मुंबई, 13 जानेवारी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (corona pandemic) राज्यात दहावी (SSC, 10th), बारावीच्या (HSC, 12 th) परीक्षा कधी होणार याची चिंता विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही लागली होती. पण आता राज्यात बोर्डाच्या परीक्षा (Board exam date) कधी होणार आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या अधिकृत तारखांची घोषणा याच आठवड्यात होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी दिली आहे.
दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी- मार्च मध्ये होत असतात. पण गतवर्षी उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे या परीक्षा 40 ते 45 दिवस पुढे ढकलण्यात येणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा साधारणतः एप्रिल-मे या महिन्यात होतील. यापूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि दहावीची परीक्षा मे मध्ये होणार असल्याचं सांगितलं होतं.
‘विद्यार्थी आणि पालकांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना असेल, तर त्यांना परीक्षांची तयारी करण्यास पुरेशा वेळ मिळेल,’ असेही पाटील यांनी यावेळी सांगितलं. शिक्षण मंडळाने नुकतचं फेरपरीक्षांचं आयोजन केलं होतं, हे आयोजन शिक्षण मंडळाने अगदी योग्यप्रकारे पार पाडलं. तसेच दोन आठवड्यांत या परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या वेळीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन आयोजन करण्यात येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हे वाचा-मोठी CA आणि लहान मुलगी UPSC उत्तीर्ण, BJP MP ओम बिरला स्वतः किती शिकलेत?
परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढवली
शिवाय पाटील यांनी पुढं असंही सांगितलं की, ज्या विद्यार्थ्यांचं दहावी परिक्षा फॉर्म भरायचे राहून गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 21 जानेवारी 2021 पर्यंत SSC परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे. परंतु त्यासाठी लेट फी भरावी लागणार आहे.