छत्रपती संभाजीनगर, 25 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असून राज्यात सर्वाधिक कोकण विभागाचा निकाल लागला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के लागला आहे. दरम्यान, राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आलं होतं. कॉपीचे प्रकार 375 आढळले होते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हस्ताक्षर घोटाळा उघडकीस आला होता. यामध्ये जवळपास चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये एकसारखे हस्ताक्षर आढळून आले होते. या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत होता.
एकसारखे हस्ताक्षर असलेल्या 372 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण हा निकाल देत असताना संबंधित विद्यार्थ्यांना ओव्हर रायटिंगचे गुण दिले गेलेले नाहीत. या प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थी सकृतदर्शनी दोषी आढळलेले नाहीत. त्यामुळे सेम हस्ताक्षराचे गुण न देता निकाल जाहीर केला असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
संभाजीनगर बोर्डात हस्ताक्षर बदल प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात जेवढी उत्तर पत्रिका लिहिली आहे तेवढ्याच लिखाणाला बोर्डाने मार्क दिले आहेत. तर हस्ताक्षर बदलले आहे त्याचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने जेवढे स्वतःचे हस्ताक्षर ओळखले आणि बोर्डाला खात्री पटली तेवढे गुण विद्यार्थ्याला दिले गेले आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होणार आहे. भौतिक शास्त्र विषयाच्या उत्तर पत्रिकेत या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदलल्याचे निदर्शनास आले. त्याचा तपास अजून सुरू असून हस्ताक्षर नेमके कुठे बदलले? उत्तर पत्रिकेत परीक्षेनंतर लिहिले कुणी याचा उलगडा बोर्डाला झालेला नाही.
कोकण अव्वल, तर तुमच्या विभागाची किती टक्केवारी? पाहा इथं
यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. नऊ विभागीय मंडळातील 14 लाख 16 हजार 372 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नऊ विभागात पुन्हा कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल 88.13 टक्के इतका मुंबई विभागाचा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.