नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर, आता पुन्हा वेगाने आर्थिक घडामोडी (Business Activities) घडू लागल्या असून भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक सुधारणा (Economic Recovery) दिसू लागली आहे. यासोबतच देशातील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये करण्यात येणाऱ्या नवीन नोकरभरतीमध्येही (Fresh Hiring) वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशात रोजगाराच्या संधींमध्ये (Job Opportunities) सातत्याने वाढ होत आहे.
रिक्रूटमेंट फर्म मायकेल पेज इंडियाच्या (Michael Page India) अहवालानुसार, मागील वर्षीच्या म्हणजेच वर्ष 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमधील नवीन नोकरीच्या संधींचा विचार करता यंदा म्हणजेच वर्ष 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत नवीन नोकरीच्या संधींमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन भरतीतील या वाढीमध्ये इंजिनीअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात (Engineering & Manufacturing Sector) सर्वाधिक भरती झाली आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी सेक्टरमध्येही (Tech Sector) नोकरीच्या संधी वाढल्या आहेत.
मायकेल पेज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निकोलस डुमोलिन (MD Nicolas Dumoulin) यांच्या मते, यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत देशात नवीन नोकरीच्या संधींमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसंच गेल्या वर्षी केलेल्या नोकरकपातीच्या तुलनेत यावर्षी नोकऱ्यांच्या संधींमध्ये 50 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
इंजिनीअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सर्वाधिक रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यानंतर टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये नोकरीच्या संधींमध्ये 58 टक्के वाढ झाली आहे. तर, कायद्याच्या क्षेत्रात 35 टक्के आणि मनुष्यबळ क्षेत्रात 25 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक घडामोडींमध्ये होत असलेली सुधारणा आणि कोरोना लसीकरणाची सतत वाढत जाणारी आकडेवारी हे नवीन नियुक्तींमध्ये वाढ होण्याचे कारण मानले जात आहे.
फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये भारतीय कंपन्यांनी वेगाने नवीन नोकरभरती केली होती. यानंतर, कोरोनाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली. त्यामुळे नोकर भरतीला ब्रेक लागला होता. आता जानेवारी-सप्टेंबर 2021 याकाळाच्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत नवीन नोकरभरतीचा वेग लक्षणीय वाढला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासोबतच लोकांची खरेदीची क्षमता वाढत आहे. त्यामुळे कंपन्याही नवीन नोकरभरती करत आहेत.
एकंदरीत लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर सर्व सेक्टरमध्ये नोकरभरती वाढलेली दिसत आहे. त्यामुळे कोरोना काळात नोकरी गमावलेल्या तरुणांसोबतच नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना चांगली संधी निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.