नवी दिल्ली, 29 जुलै : कोरोनामुळे (Corona) देशभरात लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले. या स्थितीचा एकूणच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परिणामी अनेकांना आपला रोजगार किंवा नोकऱ्या (Latest Jobs) गमवाव्या लागल्या आहेत. त्यातच नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले अनेक युवक रोजगार किंवा नोकरीच्या शोधात आहेत. अशा बेरोजगार युवकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कॉग्निझंट ही अमेरिकन आयटी कंपनी (IT Company Cognizant) यंदा भारतातल्या एक लाख जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.
कॉग्निझंट कंपनीच्या या नियोजनाचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'नं दिलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जूनपर्यंतच्या तिमाही अखेरीपर्यंत या कंपनीने जगभरातल्या 3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी सांगितलं, की 2021च्या अखेरपर्यंत कंपनी सुमारे 1,00,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखत आहे. याशिवाय सुमारे 1,00,000 असोसिएट्सना कंपनीकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कॉग्निझंट 2021 मध्ये नव्या पदवीधरांना (Fresh Graduates) नोकरी देण्याचा विचार करत आहे. तसंच 2022मध्ये नव्या 45,000 पदवीधरांना जॉब ऑफर देण्यासाठी योजना आखत आहे.
कंपनीला कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरच्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचं कंपनीच्या व्यवस्थापनाला वाटत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात या पदांसाठी नव्या उमेदवारांची गरज आहे. याबाबत ब्रायन हम्फरिज यांनी सांगितलं, की कंपनीने काही महिन्यांपूर्वी पॉलिसी शिफ्टची (Policy Shift) घोषणा केली आहे. कंपनी आता क्वार्टरली प्रमोशन सायकलचा स्रोत उपलब्ध करून देणार असून, त्याशिवाय जॉब रोटेशन आणि रि-स्किलिंग इनिशिएटिव्हवरही विचार करीत आहे. 2019 पासून कंपनीने विलीनीकरणासाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च केला आहे.
हे वाचा - मेडिकल प्रवेशामध्ये OBC 27% तर EWSसाठी 10% आरक्षण; मोदी सरकारचा मोठा निर्णय
कॉग्निझंट कंपनीने आतापर्यंत भारतातल्या 2 लाख जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना मदत मिळावी यासाठी आणि आधुनिक व्यवसायासाठी कंपनी भागीदारीच्या माध्यमातून वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत उद्दिष्ट ठेवलेल्या गुंतवणुकीद्वारे आपलं पाऊल अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कंपनीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर जेन सिग्मंड यांनी सांगितलं, की ग्राहकांच्या मोठ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने पदभरती (Recruitment) क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, कंपनीला यापुढे मनुष्यबळात गुंतवणूक करायची आहे.
जून महिन्यापर्यंतच्या तिमाहीत कंपनीला 41.8 टक्के नफा झाला आहे. यामुळे कंपनीची एकूण कमाई 512 दशलक्ष डॉलर म्हणजेच 3,801 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यंदा किमान एक लाख लोकांना नोकरी देऊ, अशी आशा कंपनीला आहे. जून 2020मध्ये कंपनीची कमाई 361 दशलक्ष डॉलर होती. त्यामुळे 2021 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 10.2 टक्क्यांवरून 11.2 टक्क्यांवर पोहोचला होता. ही असमान्य कामगिरी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी हा आकडा 4 अब्ज डॉलर होता, असं कॉग्निझंट कंपनीकडून सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Corona, Jobs