नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीने ज्याबद्दल नक्की ऐकलं असेल अशी ई-मेल सेवा म्हणजे हॉटमेल. जगातल्या पहिल्या काही ई-मेल सेवांपैकी ती एक. ती स्थापन केली होती साबीर भाटिया या भारतीय तंत्रज्ञाने. 1997 साली 40 कोटी डॉलर्सना मायक्रोसॉफ्ट कंपनीने हॉटमेल (Hotmail) विकत घेतलं. त्या काळात मायक्रोसॉफ्टने केलेलं ते सर्वांत मोठं अधिग्रहण होतं. तेव्हा साबीर भाटिया (Sabeer Bhatia) यांचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झालं होतं. त्यानंतर साबीर भाटिया आरझू डॉट कॉमसारख्या (Arzoo.com) वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सशी निगडित राहिले. तसंच, सबसे टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून ते व्हॉइल ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सर्व्हिसेसही (VoIP) देत होते. यथावकाश या दोन्ही सेवा बंद करण्यात आल्या. आता भाटिया यांनी सध्याच्या काळाशी सुसंगत असा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. शो-रील (Showreel) नावाचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म त्यांनी लाँच केला आहे. जगभरातल्या नोकरी शोधणाऱ्यांना (Job Seekers) रोजगाराच्या आणि आपली कौशल्यवृद्धी करण्याच्या (Skill Development) संधी मिळण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
ऑफलाइन विश्वातल्या माणसांच्या क्रिया-प्रतिक्रियांचं आभासी जगातलं सिम्युलेशन म्हणजे शो-रील, असं साबीर भाटिया यांनी म्हटलं आहे. भाटिया यांनी पीटीआयला सांगितलं, 'शो-रील हे कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे तयार झालेलं प्रॉडक्ट आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर आपली नोकरीसाठी निवड व्हावी म्हणून आपल्यात काय कौशल्यं आहेत, याबद्दल थेट संवाद साधणारे प्रोफेशनल व्हिडिओ (Professional Videos) का बनवले जाऊ नयेत, असा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.'
सध्या शो-रील केवळ बीटा मोडमध्ये सुरू आहे. टॅलेंटेड उमेदवार शोधणाऱ्या कंपन्या आणि आपल्या कौशल्यांचा चांगला उपयोग होईल अशी उत्तम नोकरी शोधणारे उमेदवार यांची एकमेकांशी गाठ घालून देणं हा शो-रीलच्या स्थापनेमागचा हेतू आहे. या प्लॅटफॉर्मवर हायरिंग कंपनीज (Hiring Companies) किंवा मेंटॉर्सनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिसाद म्हणून नोकरी शोधणारे उमेदवार आपले प्रोफेशनल व्हिडिओ तयार करू शकतात. नंतर हे अॅप प्रतिसादांचे हे सगळे व्हिडिओ एकत्र करून प्रोफेशनल शो-रील तयार करतं. खऱ्या आयुष्यातल्या प्रसंगांशी सांगड घालणारे हे प्रश्न उमेदवारांना स्वतःला घडवण्याची, सुधारणा करण्याची आणि प्रोफेशनल, पर्सनल, लीडरशिप, एंटरप्रेन्युरिअल ग्रोथची संधी देतील, असं त्यांचं म्हणणं आहे.
Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती
हे व्हिडिओज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही शेअर करता येतील. काही कंपनीजही शो-रीलसोबत भागीदारी करत असून, त्यामुळे योग्य, टॅलेंटेड उमेदवारांना नोकरी मिळेल. तसंच, त्या उमेदवारांना स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.
'यासाठी सध्याची वेळ अत्यंत योग्य आहे. स्मार्टफोन्सनी जग व्यापून टाकलं आहे. स्मार्टफोन्सच्या किमती कमी होत आहेत. समाजाच्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या व्यक्तींनाही स्मार्टफोन्सचा अॅक्सेस आहे. त्यामुळे उमेदवारांना स्वतःतल्या उत्तम गोष्टींचं मार्केटिंग करण्यासाठी हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे,' असं भाटिया यांनी सांगितलं.
भारतातल्याच 20 जणांनी हे अॅप डिझाइन केलं आहे. अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. काही उत्तम कंपन्यांशी शो-रील भागीदारी करत आहेत, अशी माहितीही भाटिया यांनी दिली. 'काही तरी निश्चित हेतू ठेवून तंत्रज्ञान विकसित करणं हाच कायम माझा ड्रायव्हिंग फोर्स राहिला आहे. त्यामुळेच हॉटमेलच्या माध्यमातून लाखो जणांना जोडण्यापासून आज शो-रीलची स्थापना करण्यापर्यंतचा प्रवास झाला आहे,' असं भाटिया यांनी सांगितलं. पुढच्या टप्प्यात शो-रील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही (AI) उपयोग करून त्याचा वापर अधिकाधिक संधींच्या निर्मितीसाठी करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.